ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज पावसाचा जून ते सप्टेंबर पर्यंतचा अंदाज वर्तवला. त्यावेळी राजीवन बोलत होते. राजीवन म्हणाले, देशात यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. येत्या जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार आहे. पावसाचा हा पहिला अंदाज आहे. हवामान खाते पावसाचा दुसरा अंदाज मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करेल. आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या अंदाजात 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केरळमध्ये पाऊस 1 जूनला दाखल होईल. त्यानंतर पावसाची वाटचाल मंद असेल. साधारणपणे पुण्यात 10 जून तर मुंबईत 11 जूनला मान्सून दाखल होईल.दिल्लीत हा पाऊस पोहचण्यास 27 जून उजडेल. यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याने शेती उत्पादन मुबलक होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला निसर्गाचा फटका बसणार नाही, असेही राजीवन म्हणाले.









