सातारा / प्रतिनिधी :
नुकतेच राजगड किल्ल्यावर एका नवीन प्रजातीच्या पालीचा शोध लागला आहे. या नवीन प्रजातीच्या पालीला ‘निमॅस्पिस राजगडांसिस’असे नाव देण्यात आले. या पालीचे वैशिष्ट्य म्हणजे या पालीच्या पोटखवल्यांना उंचवटे असून, ही पाल लांबीला फक्त २७ mm असल्याने भारतातील सर्वात लहान पाल म्हणूनही हिची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या संशोधन मोहिमेच्या माध्यमातून जैवविविधतेच्या दृष्टिकोणातून महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर शोधमोहिम राबवण्यात आल्या. याच शोधमोहिमेतुन गेल्या वर्षी रांगणा किल्ल्यावरून एका पालीचा शोध लावण्यात आला. या दरम्यान, अनिष परदेशी हे गडकिल्ले प्रेमी असल्याने ते गडकिल्ले फिरत असताना त्यांना राजगडावर एक पाल आढळून आली, त्यानंतर त्यांनी त्या पालीचा फोटो काढून वन्यजीव संशोधक अमित सय्यद यांना पाठवला. त्यानंतर अमित सय्यद व टीमने राजगडावर शोधमोहीम सुरू केली, व आज राजगड किल्ल्यावरून या एका नवीन पालीचा शोध लावण्यात आला.
वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीचे वन्यजीव संशोधक अमित सय्यद हे गेली 20 वर्षे वन्यजीव संशोधन तसेच वन्यजीव संवर्धनात कार्यरत असून, गेल्या 10 वर्षांपासून ते पालीच्या एका विशिष्ट कुळावर (निमॅस्पिस) अभ्यास करीत आहेत. ‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर तसेच निशाचर असल्याचे आढळून येते. त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते.









