ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी (दि.29) निधन झाले. त्या 103 वर्षांच्या होत्या.
डॉ. पद्मावती यांना न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट येथे दाखल करण्यात आले होते. मागील 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.
नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. 1950 पासून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्या अविवाहित होत्या. त्यांचे तामिळ, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. 1967 मध्ये त्यांना पद्मभूषण तर 1992 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल अवॉर्डसह इतरही पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.









