वृत्तसंस्था/ मेलबोर्न
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. गेल्या दोन आठडय़ाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी जवळपास 3000 लोकांचे बळी पडत असून चार लाख लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतातील कोरोनाग्रस्तांसाठी 50,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाग्रस्तांसाठी अधिक आर्थिक मदत जमा करण्याकरिता योजना आखण्यात आली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना आणि युनिसेफ यांच्याकडून भारताला आर्थिक मदत पुरविली जाईल, अशी ग्वाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे सुरूवातीला 50,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे बरेच क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. कोरोना समस्येला तोंड देताना ऑक्सिजनचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात भासत आहे.









