कोझीकोडच्या समुद्र किनाऱयावर पर्यटकांची गर्दी
ती वर्षांपूर्वी चीनमधून फ्लोटिंग ब्रिजचे छायाचित्र समोर आल्यावर लोक थक्क झाले होते. जंगल आणि नदीवर आकर्षक पूल तयार करण्यात आला होता. या अद्भूत दृश्याने प्रत्येकाला वेड लावले होते. परंतु या फ्लोटिंग ब्रिजचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आता विदेशात जाण्याची गरज नाही. केरळच्या कोझीकोडमध्ये फ्लोटिंग ब्रिज तयार करण्यात आला आहे.
चीनच्या फ्लोटिंग ब्रिजपेक्षा हा अत्यंत वेगळा आहे. हा नदी नव्हे तर समुद्रात तयार करण्यात आला आहे. म्हणजेच समुद्राच्या लाटांसोबत हा ब्रिज देखील हलत असतो. सागरी लाटा पुढे सरकू लागताच हा ब्रिज हवेत झुलतो. सुमारे 100 मीटर लांब या ब्रिजवर जाण्यासाठी पर्यटकांना सर्वप्रथम लाइफ जॅकेट परिधान केले जाते.
हा पूल 100 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद आहे. फ्लोटिंग ब्रिज हाय-डेन्सिटी पॉलिइथाइलीन (एचडीपीई) ब्लॉकने तयार करण्यात आलेला आहे. पूलासाठी 7 किलो वजनाच्या 1300 एचडीपीई ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे. त्यांना गरजेनुसार कुठेही हलविता येते.
पूलाची क्षमता
या पूलावर एकाचवेळी 500 लोकांना नेता येते. परंतु सध्या लाइफ जॅकेट परिधान केलेल्या 50 जणांनाच ब्रिजवर जाण्याची अनुमती आहे. पूलाच्या अखेरीस समुद्रात फैलावलेला 15 मीटर रुंद प्लॅटफॉर्म असून तेथे लोक समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. पूलावर जाण्याकरता सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ निश्चित करण्यात आला आहे.
वेगळा अनुभव
तरंगत्या पुलाच्या चहुबाजूला फिरल्यावर पर्यटकांना आपण पाण्यावर चालत आहोत असा भास होतो. केरळच्या पर्यटन विभागाने कोझीकोडच्या बेपोर समुद्र किनाऱयावर लाटांसोबत चालण्यासाठी तरंगत्या पुलाची निर्मिती केली आहे.









