ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. भारतासोबत आता अमेरिकेतही हा सोहळा साजरा केला जाणार आहे. न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर भगवान रामाचा फोटो आणि अयोध्येतील राम मंदिराची 3D प्रतिमा दाखवली जाणार आहे. ही माहिती अमेरिकेतील हिंदू समाजाचे नेते जगदीश सेव्हानी यांनी दिली.
सेव्हानी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी भारताचा राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. हा ऐतहासिक क्षण आम्ही देखील अमेरिकेत साजरा करणार आहोत. यासाठी आम्ही टाईम्स स्क्वेअरची 17 हजार स्क्वेअर फूटची एलईडी स्क्रीन भाड्याने घेतली आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते रात्री दहा भगवान श्रीरामाचे 3D प्रतिमा दाखवली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, हा सोहळा आयुष्यात एकदाच येणारा किंवा शतकातून एकदा पाहायला मिळणारा असा आहे. त्यामुळे आपल्याला हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे. संपूर्ण भारतीय समाज 5 ऑगस्ट रोजी एकत्र येऊन या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार बनणार आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.









