आयसीसी टी-20 विश्वचषकातील सराव सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून फडशा,
दुबई / वृत्तसंस्था
केएल राहुल (24 चेंडूत 51) व इशान किशन (46 चेंडूत 70) यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या बळावर भारताने आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सराव सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून फडशा पाडला. प्रारंभी, इंग्लंडने 20 षटकात 5 बाद 188 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारताने 19 षटकात 3 बाद 192 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला.
केएल राहुलने 24 चेंडूत 51 धावांच्या खेळीत 6 चौकार व 3 षटकार फटकावले तर इशान किशन 46 चेंडूत 70 धावांवर निवृत्त झाला. त्याच्या अर्धशतकी खेळीत 3 षटकार व 7 चौकारांचा समावेश राहिला. या उभयतांच्या फटकेबाजीमुळे भारताने एका षटकाचा खेळ बाकी राखत दमदार विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट कोहलीचा (11) खराब फॉर्म मात्र पुन्हा एकदा चिंतेचा ठरला.
सलामीवीर या नात्याने खेळत नसल्यास राखीव खेळाडूत बसावे लागेल, हे निश्चित असलेल्या इशान किशनने विशेषतः फिरकीपटूंचा उत्तम समाचार घेतला. भारताचे अनुभवी जलद गोलंदाज जसप्रित बुमराह (1-26) व मोहम्मद शमी (3-40) यांनी नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी केली. त्या तुलनेत भुवनेश्वर मात्र महागडा ठरला. त्याला 4 षटकात 54 धावा मोजाव्या लागल्या.
धावफलक
इंग्लंड ः 20 षटकात 5 बाद 188 (जॉनी बेअरस्टो 36 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 49, मोईन अली 20 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 43. अवांतर 12. मोहम्मद शमी 4 षटकात 3-40, राहुल चहर, बुमराह प्रत्येकी 1 बळी).
भारत ः 19 षटकात 3 बाद 192 (इशान किशन 46 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 70, केएल राहुल 24 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 51, रिषभ पंत 14 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 29, हार्दिक पंडय़ा 10 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 16. डेव्हिड विली, मार्क वूड, लिव्हिंगस्टोन प्रत्येकी 1 बळी).
श्रीलंकेची नामिबियावर एकतर्फी मात
अबु धाबी ः माजी चॅम्पियन्स श्रीलंकेने पात्रता फेरीतील लढतीत नामिबियाचा 7 गडी राखून पराभव केला. लंकन गोलंदाजांनी तुलनेने अननुभवी नामिबियाचा डाव 96 षटकात खुर्दा केला आणि प्रत्युत्तरात 6.3 षटकांचा खेळ बाकी राखत विजय संपादन केला. लंकेतर्फे महेश तीक्षणा (3-25) व वणिंदू हसरंगा (2-24) यांनी प्रभावी गोलंदाजी साकारली.









