कोरोना लसीचे काम पाहण्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी हैदराबादमध्ये
वृत्तसंस्था / हैदराबाद
ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास जरी पहिल्यांदा सुरुवात झाली असली तरीही जगभराच्या नजरा भारताकडे लागलेल्या आहेत. कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या ‘महायुद्धा’त भारताकडून अनेक देशांना प्रचंड अपेक्षा आहेत. त्याच अनुषंगाने जगभरातील 64 देशांचे प्रतिनिधी बुधवारी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये राजदूत आणि ज्ये÷ राजनयिक अधिकाऱयांचा समावेश आहे. कोरोना लस तयार करणाऱया भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल-ई सारख्या स्वदेशी कंपन्यांमधील उत्पादनाची माहिती या सर्वांनी दिली जाणार आहे.
भारत लसनिर्मिती आणि उत्पादन क्षमतेची ताकद सध्या जगाला दाखवत आहे. भारतात लसनिर्मितीमध्ये तीन कंपन्या आघाडीवर असून त्यांना अन्य कंपन्यांसह सरकारकडून सहकार्य मिळत आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत विदेशी अधिकाऱयांचे पथक भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल-ई सारख्या कंपन्यांमधील लस उत्पादन क्षमता पाहणार आहेत. भारत बायोटेकने कोवॅक्सिन नावाची लस विकसित केली आहे, तर ओहायो स्टेट इनोव्हेशन फंडने बायोलॉजिकल-ई कंपनीबरोबर भागिदारी केली आहे.
कोण-कोणत्या देशाचे प्रतिनिधी सहभागी?
जगातील भिन्न भौगोलिक प्रदेशांचे प्रतिनिधित्व यामध्ये समाविष्ट केले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये अमेरिकी दुतावासातील आरोग्य प्रतिनिधींचा समावेश आहे. शेजारच्या देशांमध्ये श्रीलंका, म्यानमार, भूतान, बांगलादेश, मालदीव यांचा समावेश आहे. इराणसह मध्य आशियातील किर्गिजस्तान आणि अझरबैजान हे देश देखील आहेत. युरोपमधील हंगेरी, आईसलँड, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक इ. आणि दक्षिणपूर्व आशियातील कंबोडिया,
मलेशिया, सिंगापूर यासह अनेक देशही आहेत. इथिओपिया, नायजेरिया, इजिप्त, चाड, नायजर व्यतिरिक्त आफ्रिकेतीलही बरेच देश आहेत. लॅटिन प्रदेशातही ब्राझील, मेक्सिको, अल सल्वाडोर, बोलिव्हियासारखे देश आहेत. पूर्व आशियातील दक्षिण कोरिया आणि दक्षिण विभागातील ऑस्ट्रेलिया या देशांचा या दौऱयात समावेश आहे. परंतु चीन आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींचा यात समावेश नसल्याचे सांगण्यात आले.
भारताचे मोठे यश
सध्या भारतात गुजरात, पुणे आणि हैदराबाद आदी तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत. हे एक मोठे यश म्हणावे लागेल.