वृत्तसंस्था/ अल्मेटी
येथे सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरीच्या कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या आघाडीच्या ग्रीको रोमन प्रकारातील मल्लांना उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांना आता ऑलिंपिक पात्रतेला मुकावे लागणार आहे. भारताचा मल्ल सुनीलकुमार याच्याकडून बरीच अपेक्षा होती. पण उपांत्य फेरीत त्याला किर्जीस्तानच्या मल्लाकडून हार पत्करावी लागली.
या स्पर्धेच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी भारताच्या पाच मल्लांना आपल्या विविध वजनगटामध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱया मल्लाला टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळणार आहे. 87 किलो वजनगटातील पहिल्या लढतीत आशियाई स्पर्धेतील विजेता मल्ल सुनीलकुमारने किर्जीस्तानच्या अब्दुलखेववर 7-0 असा विजय मिळविला. त्यानंतर उपांत्य लढतीत त्याला येथील स्थानिक मल्ल टुर्सेनोव्हने 9-5 अशा गुणांनी हरविल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या ग्रीको रोमन प्रकारातील एकाही मल्लाला आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. पण फ्रिस्टाईल प्रकारात भारताच्या बजरंग पुनिया (65 किलो गट), रवी दाहिया (57 किलो गट) आणि दीपक पुनिया (86 किलो गट) या तीन मल्लांनी विश्व कुस्ती स्पर्धेतून ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. महिलांच्या विभागात भारताची एकमेव महिला मल्ल विनेश फोगट (53 किलो गट) ही पात्र ठरली आहे.
ग्रीको रोमन पद्धतीच्या विभागात भारताच्या ज्ञानेंद्र (60 किलो), अन्शू (67 किलो), गुरप्रितसिंग (77 किलो), नवीन (130 किलो) या मल्लांना आपल्या उपांत्य फेरीतील लढती गमवाव्या लागल्या. भारताचे हे मल्ल आता कांस्यपदकासाठी लढत देतील. 97 किलो वजन गटात भारताच्या रवीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या विभागातील कुस्ती लढतीना शनिवारी प्रारंभ होत असून पुरुषांच्या फ्रिस्टाईल गटातील लढती रविवारपासून खेळविल्या जाणार आहेत. भारताच्या ज्ञानेंद्रला किर्जीस्तानच्या शेरसेनबेकोव्ह याच्याकडून 1-6 अशा गुणाने उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागला. किर्जीस्तानच्या मेकमुडोव्हने गुरप्रितसिंगला उपांत्य लढतीत 8-2 अशा गुणांनी पराभूत केले. 130 किलो गटात कोरियाच्या किमने भारताच्या नवीनवर 7-1 अशा गुणांनी मात केली.









