बिपरजॉय#taru
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने गेल्या काही वर्षांत विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज एक उदाहरण बनत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना प्रत्येकाची जबाबदारी अधिकच वाढते. बिपरजॉय चक्रीवादळाच्या काळात लोकांनी प्रशासकीय यंत्रणांना योग्य प्रतिसाद दिल्यामुळे भारताच्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद दिसून आल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. नैसर्गिक आपत्तींना कोणीही रोखू शकत नाही. परंतु, भारताने गेल्या काही वर्षांत विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज एक उदाहरण बनून पुढे येत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मासिक रेडिओ शो ‘मन की बात’च्या 102 व्या भागाला रविवारी संबोधित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण ‘मन की बात’मधून संवाद साधत असतो. मात्र मी पुढच्या आठवड्यात पूर्वनियोजित दौऱ्यानुसार अमेरिकेत जात असल्यामुळे एक आठवडा अगोदरच आपल्या भेटीसाठी आल्याचे पंतप्रधानांनी सुरुवातीला नमूद केले. त्यानंतर त्यांनी ‘मन की बात’साठी आलेल्या कौतुकपर पत्रांचा संदर्भ दिल्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वीच देशाच्या पश्चिम भागात आदळलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाबाबत लोकांनी दिलेल्या योग्य प्रतिसादाची माहिती दिली. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. पण कच्छच्या लोकांनी ज्या धाडसाने आणि तत्परतेने अशा धोकादायक चक्रीवादळाचा मुकाबला केला तो अभूतपूर्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कच्छ लवकरच सावरेल!
दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर कच्छ कधीही सावरणार नसल्याचा दावा केला जात होता. मात्र, आज हाच जिल्हा देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिह्यांपैकी एक आहे. आता कच्छचे लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विनाशातूनही लवकरच सावरतील याची मला खात्री आहे, असेही मोदी पुढे म्हणाले. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी आणीबाणीच्या काळाची आठवण करून देतानाच भारतीय लोकशाहीशी संबंधित काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.









