वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बेंगळूरमध्ये साईच्या क्रीडा संकुलात भारतीय राष्ट्रीय हॉकी संघासाठी 20 ऑगस्टपासून सरावाचे हॉकी शिबीर सुरू करण्यात येणार आहे. या शिबिरात दाखल होण्यासाठी भारतीय हॉकीपटूंचे गेल्या आठवडय़ात विविध ठिकाणाहून बेंगळूरमध्ये आगमन झाले. दरम्यान सहा भारतीय हॉकीपटूंना कोरोनाची बाधा झाली असून खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना बेंगळूरमधील एका खासगी रूग्णालयात हालविण्यात आले आहे.
बेंगळूरमधील स्पर्श या खासगी रूग्णलयात मंगळवारी सायंकाळी भारताच्या पाच हॉकीपटूंना दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी म्हणजे सोमवारी रात्री रक्तातील प्राणवायूची पातळी कमी होत असल्याने मनदीप सिंगला स्पर्श रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती साईच्या अधिकाऱयांनी दिली. रूग्णालयात दाखल केलेल्या हॉकीपटूमध्ये कर्णधार मनप्रित सिंग, मनदीप सिंग, सुरेंद्रकुमार, गोलरक्षक कृष्णन पाठक, जेसकरन सिंग आणि वरूणकुमार यांचा समावेश आहे. सराव शिबिरासाठी दाखल झालेले सर्व महिला ऍथलीटस्ची कोरोना चांचणी घेण्यात आली असून हे सर्व खेळाडू निगेटिव्ह असल्याने ते आता आपल्या ऍथलेटिक्स सरावाला लवकरच प्रारंभ करणार आहेत.









