ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोकण रेल्वेचे निर्माते आणि देशाचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन लवकरच राजकारणात उतरणार असून ते भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. केरळमध्ये ई. श्रीधरन यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती केरळ भाजपचे के. सुरेंद्रन यांनी दिली.
ते म्हणाले, 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय यात्रेदरम्यान ई. श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, ई. श्रीधरन हे 88 वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये 1932 साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत. 2002 रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचे मार्गदर्शन केले होते.
तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या कामानिमित्त त्यांचा जगभरामध्ये नावलौकिक आहे. 2001 साली त्यांना पद्मश्री तर 2008 साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2005 साली फ्रान्स सरकारने त्यांना विशेष पुरस्कार जाहीर केला होता. तर 2003 साली टाइम मॅगझिनने त्यांचा उल्लेख आशियाज हिरो या नामावंत व्यक्तींच्या यादीमध्ये केला होता.