वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेला आता केवळ चार दिवस बाकी असताना भारतीय क्रीडा पथकाला उत्तेजक चाचणीच्या बातमीने जबरदस्त धक्का दिला आहे. या स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय चमूतील दोन पॅराऍथलिट्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे सांगण्यात आले.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय पॅराऍथलिट्स चमूमधील खेळाडूंची उत्तेजक चाचणीत पुणे आणि दिल्लीतील नाडाच्या केंद्रामध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये भारतीय संघातील 2 ऍथलिट्स दोषी असल्याचे आढळून आले. या खेळाडूंच्या मूत्रल चाचणीमध्ये निर्बंध घातलेले द्रव्य आढळल्याने आता या दोन्ही खेळाडूवर हंगामी स्वरुपाची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 30 जणांचा पॅराऍथलिट्स संघ जाहीर करण्यात आला पण उत्तेजक चाचणीत दोषी असलेल्या दोन खेळाडूंना आता वगळण्यात आले आहे. या चाचणीमध्ये भारतीय संघातील अनीशकुमार सुरेंद्रन पिल्ले आणि हरियाणाची महिला ऍथलिट्स गीता हे दोन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले आहेत.









