दुसरा डाव 174 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतरही भारत सामन्यात भक्कम स्थितीत, चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिका 1 बाद 22
सेंच्युरियन / वृत्तसंस्था
दुसऱया डावात झगडावे लागले असले तरी भारताने येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे कडवे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात यजमान संघाची तडे जात असलेल्या खेळपट्टीवर चहापानावेळी 1 बाद 22 अशी खराब सुरुवात झाली होती.
बुधवारी या लढतीच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारा (16), कर्णधार विराट कोहली (18), अजिंक्य रहाणे (20) हे झगडणारे त्रिकुट स्वस्तात बाद झाले आणि भारताला याचा फटका बसला. केएल राहुल (23), रिषभ पंत (34) व रविचंद्रन अश्विन (14) यांनी थोडीफार फटकेबाजी केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे अनुभवी कॅगिसो रबाडा (4-42) व पदार्पणवीर मार्को जान्सन (4-55) यांनी भारतीय फलंदाजीला खिंडार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला. लुंगी एन्गिडीने 31 धावात उर्वरित 2 बळी घेतले.

सुपरस्पोर्ट पार्क ट्रकवरील या लढतीत 305 धावांचे आव्हान पार करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडे 140 पेक्षा अधिक षटके उपलब्ध असतील. मात्र, या मैदानावर हा पाठलाग अर्थातच आव्हानात्मक असेल. या मैदानावर 2000-01 मध्ये इंग्लंडने 251 धावा जमवत विजय संपादन केला आणि तोच आजवरचा सर्वात यशस्वी पाठलाग ठरला आहे. दक्षिण आफ्रिकन फलंदाजी लाईनअपमध्ये पूर्वीसारखा दर्जा राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती असून बुमराह, शमी व सिराज यांना सामोरे जात त्रिशतकी आव्हान पार करणे त्यांच्यासाठी सहजसोपे अजिबात नसेल.
भारताची मधली फळी या लढतीत पार कोसळल्याने ही चिंतेची बाब ठरली. त्यातच कर्णधार विराट कोहलीचा बॅड पॅच येथेही कायम राहिल्याने त्यात आणखी भर पडली. 2018 मधील मागील मालिकेत नेट बॉलर म्हणून सहभागी असलेल्या युवा मार्को जान्सनने येथे विराट कोहलीचा बळी घेत आश्चर्याचा धक्का दिला.
पुजाराने पुन्हा एकदा संथ फलंदाजी केल्यानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर लेगसाईडवरील क्विन्टॉन डी कॉककडे झेल दिला. रहाणे ज्या पद्धतीने बाद झाला, ते सर्वात धक्कादायक ठरले. त्यापूर्वी त्याने जान्सनला 1 षटकार व 1 चौकार फटकावला होता. रहाणेने पूल फटका मारण्याच्या प्रयत्नात डीप स्क्वेअर लेगवर डय़ुसेनकडे झेल दिला. पंतने चेंडूमागे 1 धाव या समीकरणाने 34 धावांची खेळी साकारली नसती तर भारताने दक्षिण आफ्रिकेला त्रिशतकी आव्हान देणेही शक्य झाले नसते. भारतीय संघाने दिवसातील पहिल्या सत्रात 63 धावा केल्या. यात केएल राहुलची 74 चेंडूत 23 धावांची खेळी महत्त्वाची ठरली.
मध्यंतरी चेंडूचा आघात बसल्याने केएल राहुलला प्रथमोपचार घ्यावे लागले आणि यात एकाग्रता भंगल्यानंतर त्याने एन्गिडीच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लीपमध्ये एल्गारकडे झेल दिला.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 327.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद 197
भारत दुसरा डाव ः केएल राहुल झे. एल्गार, गो. एन्गिडी 23 (74 चेंडूत 4 चौकार), मयांक अगरवाल झे. डी कॉक, गो. जान्सन 4 (14 चेंडूत 1 चौकार), शार्दुल ठाकुर झे. मल्डर, गो. रबाडा 10 (26 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा झे. डी कॉक, गो. एन्गिडी 16 (64 चेंडूत 3 चौकार), विराट कोहली झे. डी कॉक, गो. जान्सन 18 (32 चेंडूत 4 चौकार), अजिंक्य रहाणे झे. व्हान डेर डय़ुसेन, गो. जान्सन 20 (23 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रिषभ पंत झे. एन्गिडी, गो. रबाडा 34 (34 चेंडूत 6 चौकार), रविचंदन अश्विन झे. पीटरसन, गो. रबाडा 14 (17 चेंडूत 2 चौकार), मोहम्मद शमी झे. मल्डर, गो. रबाडा 1 (12 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 7 (8 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद सिराज त्रि. गो. जान्सन 0 (5 चेंडू). अवांतर 27. एकूण 50.3 षटकात सर्वबाद 174.
गडी बाद होण्याचा क्रम
1-12 (मयांक, 5.1), 2-34 (शार्दुल, 12.5), 3-54 (केएल राहुल, 22.3), 4-79 (विराट, 32.1), 5-109 (पुजारा, 37.1), 6-111 (रहाणे, 38.5), 7-146 (अश्विन, 45.1), 8-166 (पंत, 47.3), 9-169 (शमी, 49.2), 10-174 (सिराज, 50.3).
गोलंदाजी
रबाडा 17-4-42-4, लुंगी एन्गिडी 10-2-31-2, मार्को जान्सन 13.3-4-55-4, वियान मल्डर 10-4-25-0.
रिषभ पंतने जलद 100 बळींचा धोनीचा विक्रम मोडला
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळींचा नवा विक्रम रिषभ पंतने प्रस्थापित केला. पंतने 26 सामन्यात हा माईलस्टोन सर केला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात बवूमाचा झेल टिपत त्याने या विक्रमाला गवसणी घातली. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या खात्यावर नोंद होता. धोनीला 100 बळींसाठी 36 सामने खेळावे लागले होते. या यादीत किरण मोरे (39) व नयन मोंगिया अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानी विराजमान आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वात जलद 100 बळींचा टप्पा सर करण्याचा विक्रम द. आफ्रिकन यष्टीरक्षक क्विन्टॉन डी कॉकच्या (22) खात्यावर आहे.
यष्टीमागे त्रिशतकी बळी घेणारा पंत सहावा भारतीय यष्टीरक्षक
यष्टीमागे 100 बळी टिपणारा रिषभ पंत हा केवळ 6 वा भारतीय यष्टीरक्षक ठरला. तूर्तास यष्टीमागे सर्वाधिक बळींचा विक्रम धोनीच्या खात्यावर असून त्याच्या खात्यावर 294 बळी नोंद आहेत.
यष्टीमागे सर्वाधिक बळी घेणारे भारतीय यष्टीरक्षक
बळी / यष्टीरक्षक
294 / महेंद्रसिंग धोनी
198 / सईद किरमाणी
130 / किरण मोरे
107 / नयन मोंगिया
104 / वृद्धिमान साहा
103 / रिषभ पंत.









