आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग चॅम्पियनशिप – चौघांना कांस्यपदके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ व युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तीन बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली तर चार जणांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
रोहित चमोली (48 किलो गट) व भरत जून (81 किलोवरील गट) यांनी मुलांच्या विभागात अंतिम फेरी गाठली तर मुस्कानने (46 किलो गट) मुलींच्या विभागात अंतिम फेरी गाठली. भरतने किर्गिजस्तानच्या एमिर खान रझापोव्हवर 5-0 अशी एकतर्फी मात केली तर चमोलीने कझाकच्या ऐदार कादीरखानवर याच फरकाने मात केली. मुस्कानने कझाकच्या येलयानुर तुर्गानोव्हावर एकतर्फी विजय मिळविला. मात्र 66 किलो गटात सुप्रिया रावतला सनोवर बोझोरबोएव्हाकडून 1-4 असा तर आरझूला (54 किलो गट) उझ्बेकच्या गुल्दाना तिल्यूरजेनकडून 2-3 असा निसटता पराभव पत्करावा लागला. मुलींच्या विभागात आणखी एका उपांत्य सामन्यात देविका घोरपडेला (50 किलो) उझ्बेकच्या शायना नेमातोव्हेनकडून 0-5 असे पराभूत व्हावे लागले. मुलांमध्ये अंकुशला (66 किलो) उझ्बेकच्या फझलिद्दिन एर्किनबोएव्हने हरवित अंतिम फेरी गाठली. पराभूत झालेल्या या चारही जणांना कांस्यपदक मिळाले. स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात त्याच दिवशी भारताची 20 हून अधिक पदके निश्चित झाली होती. कोरोनाच्या कारणास्तव अनेक देशांनी माघार घेतल्याने स्पर्धकांची संख्या कमी होती. त्यामुळे भारताची पदके निश्चित झाली होती









