पाचव्या व अखेरच्या टी-20 सामन्यात भारताची 7 धावांनी बाजी
वृत्तसंस्था/ माऊंट माऊनगुनाई
नव्या वर्षात पहिलाच परदेश दौरा करणाऱया भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रविवारी झालेल्या पाचव्या व अखेरच्या टी-20 सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हॉईटवॉश दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 3 बाद 163 धावा केल्या. यानंतर, यजमान किवीज संघाला 9 बाद 156 धावांत रोखत विजय साकारला. या कामगिरीसह न्यूझीलंडच्या भूमीत द्विपक्षीय मालिकेत निर्भेळ यश मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. अखेरच्या सामन्यात तीन बळी मिळवणारा जसप्रीत बुमराह सामनावीर तर केएल राहुल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पाच सामन्यांच्या मालिकेत चार विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली. यानंतर, विराटच्या गैरहजेरीत कर्णधारपद भुषवणाऱया रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत दुसऱयांदा संधी मिळालेल्या संजू सॅमसन व केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. पण, दुसऱयाच षटकांत सॅमसनला 2 धावांवर कॅगलिनने बाद करत भारताला पहिला धक्का दिला. पण राहुल व रोहित शर्मा यांनी दुसऱया गडय़ासाठी 88 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
रोहितचे दमदार अर्धशतक
रोहित-राहुल जोडीने किवीज गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत फटकेबाजी केली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना राहुलला बेनेटने बाद करत ही जोडी फोडली. त्याने 33 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 45 धावा फटकावल्या. दुसरीकडे, राहुल बाद झाल्यानंतर रोहितने मात्र फटकेबाजी कायम ठेवली. दरम्यान, त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील 25 वे अर्धशतक साजरे केल. अर्धशतकानंतर मात्र त्याच्या पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने 41 चेंडूचा सामना करताना 3 चौकार व 3 षटकारासह 60 धावा तडकावल्या.
रोहित मैदानाबाहेर गेल्यानंतर अखेरच्या चार षटकांत भारताला केवळ 25 धावा करता आल्या. शिवम दुबे पुन्हा एकदा अपयशी ठरला. 5 धावांवर त्याला कॅगलिनने तंबूचा रस्ता दाखवला. मुंबईकर श्रेयस अय्यरने 31 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारासह नाबाद 33 धावा तर मनीष पांडेने 4 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह नाबाद 11 धावांचे योगदान दिल्याने भारताला 20 षटकांत 3 बाद 163 धावापर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे, रोहित मैदानाबाहेर गेल्यानंतर किवीज गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत भारतीय फलंदाजांवर चांगलाच दबाव आणल्याने धावगती मंदावली गेली. यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला दोनशेचा टप्पा गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून कुग्लाईनने 2 तर हॅमिश बेनेटने 1 गडी बाद केला.
न्यूझीलंड पुन्हा अपयशी
164 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे आघाडीचे तीन फलंदाज 17 धावांत बाद झाले. सलामीवीर गुप्टीलला (2) बुमराहने पायचीत करत यजमान संघाला पहिला धक्का दिला. कॉलिन मुनरोचा (15) वॉशिंग्टन सुंदरने त्रिफळा उडवला. टॉम ब्रुसला भोपळाही फोडता आला नाही. 3 बाद 17 अशा बिकट स्थितीतून रॉस टेलर व टीम सेफर्ट यांनी चौथ्या गडय़ासाठी 99 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. डावातील शिवम दुबेने टाकलेल्या 10 व्या षटकांत या दोघांनी 34 धावा वसूल केल्या. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. ही जोडी न्यूझीलंडला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच नवदीप सैनीने सेफर्टला बाद करत ही जोडी फोडली. सेफर्टने 30 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह आक्रमक 50 धावांची खेळी साकारली.
सेफर्ट बाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी निराशा केली. लागोपाठ विकेट फेकत न्यूझीलंडने सोपे आव्हान कठीण करुन ठेवले. शार्दुल ठाकुरने आपल्या एकाच षटकात दोन बळी घेत न्यूझीलंडची 7 बाद 132 अशी अवस्था केली. टेलरने एका बाजुने किल्ला लढवताना 47 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 53 धावा केल्या. पण, त्यालाही सैनीने बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. यानंतर, शार्दुलने टाकलेल्या अखेरच्या षटकात ईश सोधीने दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली, पण पुढील चेंडूवर शार्दुलने नियंत्रण ठेवत किवीज फलंदाजांना फटकेबाजीची संधी दिली नाही. यामुळे न्यूझीलंडला 9 बाद 156 धावापर्यंतच मजल मारता आली.
भारताकडून बुमराहने 3 तर नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी 2 तर वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 3 बाद 163 (केएल राहुल 33 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 45, संजू सॅमसन 5 चेंडूत 2, रोहित शर्मा निवृत्त 41 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांसह 60, श्रेयस अय्यर 31 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 33, शिवम दुबे 5, मनीष पांडे 4 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह नाबाद 11, कुग्लाईन 2/25, बेनेट 1/21).
न्यूझीलंड 20 षटकांत 9 बाद 156 (गुप्टील 2, कॉलिन मुनरो 15, टीम सेफर्ट 30 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांसह 50, रॉस टेलर 47 चेंडूत 53, ईश सोधी 10 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 16, साऊथी 6, बुमराह 12 धावांत 3 बळी, नवदीप सैनी व शार्दुल ठाकुर प्रत्येकी 2 बळी, वॉशिंग्टन सुंदर 1 बळी).
केएल राहुलचा अनोखा विक्रम
न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात खेळताना केएल राहुलने एक अनोखा विक्रम केला आहे. त्याने 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. राहुलचे आता न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 224 धावा झाल्या आहेत. यामुळे तो एका द्विपक्षीय टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱया क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोला मागे टाकले आहे. मुन्रोने 2017-18 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 223 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे राहुल एका द्विपक्षीय टी 20 मालिकेत भारताकडून 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाराही पहिला फलंदाज आहे.
एका द्विपक्षीय टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
233 धावा ा दामियाओ कौआना (मोझांबिक विरुद्ध मालावी, 2019)
224 धावा ा केएल राहुल (भारत विरुद्ध न्यूझीलंड, 2020)
223 धावा ा कॉलिन मुनरो (न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2017-18)
एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय –
224 धावा ा केएल राहुल (विरुद्ध न्यूझीलंड, 2020)
199 धावा ा विराट कोहली (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016)
183 धावा ा विराट कोहली (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)
164 धावा ा केएल राहुल (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)
रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण
किवीजविरुद्ध अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने एक खास विक्रम देखील केला आहे. या सामन्यात रोहितने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो 8 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, एमएस धोनी, विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन या भारतीय क्रिकेटपटूंनी हा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 664 सामन्यात 34357 धावा केल्या आहेत. रोहितच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 364 सामन्यात 14029 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 39 शतकांचा आणि 74 अर्धशतकांचा समावेश आहे.











