वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी संकुलात सध्या सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवेळी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये भारताचे आणखी दोन नेमबाज कोरोना बाधित आढळले आहेत. आता या स्पर्धेमध्ये कोरोना बाधित असलेल्या नेमबाजांची संख्या सहा झाली आहे.
कोरोनाच्या नियमावलीनुसार कोरोना बाधित आढळलेल्या या दोन नेमबाजांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी कोरोना चाचणीमध्ये तीन नेमबाज पॉझिटिव्ह आढळले असून त्यामध्ये भारतीय पिस्तुल नेमबाजी संघातील दोघांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या दुसऱया दिवसाअखेर एकूण सहा नेमबाज कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले असून स्पर्धा आयोजकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.









