कनिष्ठ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या आठ बॉक्सर्सनी आयबीए ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. अर्मेनियातील येरेव्हन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचा गुरुवार सहावा दिवस होता.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली असून सातपैकी सहा कनिष्ठ गटातील मुलींनी आपापल्या गटातून उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळविणाऱ्या परी (50 किलो) व निधी (66 किलो) यांनी आपापल्या गटात अनुक्रमे रोमानियाची मिकेला मुलेर व तिची तैपेईची काओ चुन अई यांच्यावर 5-0 याच फरकाने विजय मिळविला. पायलने 48 किलो गटात आयर्लंडच्या डोहर्टी लॉरेनवर 5-0, अमिशाने 54 किलो गटात दक्षिण कोरियाच्या किम जियाइचा एकतर्फी पराभव करीत आगेकूच केली.
आशियाई कनिष्ठ स्पर्धेतील रौप्यविजेत्या नेहा लुन्थीने 46 किलो गटाच्या लढतीत बेलारुसच्या हिझोस्काया अॅनहेलिनावर 4-1 अशी मात केली तर प्राचीला 54 किलो गटातील लढतीत कझाकच्या सीयीतखानकिझीक पनारविरुद्ध संघर्ष करावा लागला. पहिल्या फेरीत तिला प्रतिस्पर्धीचा अंदाज घेण्यासाठी झगडावे लागले. पण नंतरच्या दोन फेऱ्यांत तिने जोरदार मुसंडी मारत 3-2 असा विजय मिळविला. जॉयश्री देवी ही एकमेव भारतीय या फेरीत पराभूत झाली. तिला 60 किलो गटाच्या लढतीत रशियाच्या लिओनोव्हा किराकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला.
कनिष्ठ मुलांच्या विभागात चारपैकी दोघांनी पदकाच्या फेरीत स्थान मिळविले. आशियाई ज्युनियर सुवर्णविजेता हार्दिक पन्वरने 80 किलो गटात व जतिनने 54 किलो गटात विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. त्यांनी अनुक्रमे दक्षिण कोरियाचा पार्क डीमह्योऑन व जॉर्जियाचा मुश्कुदियानी डॅविच यांच्यावर एकतर्फी विजय मिळविले. 46 किलो गटात ब्रिजेश व 50 किलो गटात दिवाश कटारे यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. आणखी पाच मुला-मुलींना उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. उपांत्य लढती 2 डिसेंबर रोजी तर 3 व 4 डिसेंबर रोजी अंतिम लढती होतील.









