स्वदेशी के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी : पाण्यातूनही पाक-चीनवर प्रतिहल्ला शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनची राजधानी बीजिंगपासून पाकिस्तानमधील सर्व शहरांना टार्गेट करू शकणाऱया स्वदेशी ‘के-4’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच भारताकडून यशस्वीपणे घेण्यात आली. जवळपास 3 हजार 500 किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यासही सक्षम आहे. या चाचणीनंतर भारतीय सुरक्षा दले पाणबुडीमधून शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य भेदण्यासाठी आणखी मजबूत झाली आहे.
आयएनएस अरिहंत या आण्विक पाणबुडीवरून ‘के-4’ क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी आंध्र प्रदेशच्या किनाऱयावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करण्यात येत होते. स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी ‘के-4’ हे एक आहे. के-4 शिवाय दुसरे क्षेपणास्त्र बिओ-5 आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. ही क्षेपणास्त्रे अरिहंत वर्गातील पाणबुडीवर तैनात करण्यात येणार आहेत. 2000 किलो वजनापर्यंत शस्त्रे घेऊन जाण्याची त्याची क्षमता आहे. 12 मीटर लांब असलेले हे क्षेपणास्त्र 1.3 मीटर गोलाकार आहे. 17 टन वजन असलेल्या या क्षेपणास्त्राची 20 मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता आहे.
जमीन, हवा आणि पाण्यातून अणु क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे.
‘के-4’ची वैशिष्टय़े…
12 मीटर : लांबी
1.3 मीटर : आकार
17 टन : वजन
2000 किलो शस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता
20 मीटर खोल पाण्यातून हल्ल्याची क्षमता
‘सुखोई’ रोखणार चीनच्या हालचाली…
तामिळनाडूतील तंजावर येथे ब्राम्होस क्षेपणास्त्राने सज्ज सुखोई ताफ्याचा सोमवारी वायुदलात समावेश करण्यात आला. या सुखोई विमानांवर 290 किलोमीटरपर्यंत मारा करणारी अत्याधुनिक ब्राम्होस क्रूझ मिसाईल्स तैनात असणार आहेत. सुखोईच्या या नव्या स्क्वॉड्रनला ‘टायगर शार्क’ असे नाव देण्यात आले आहे. सहा सुखोई विमानांच्या स्क्वॉड्रनचे उद्घाटन झाले असून वर्षअखेरीस ही संख्या पूर्ण म्हणजे 18 विमानांची करण्यात येणार आहे. भारतीय समुद्रांमध्ये चीनच्या हालचाली वाढल्यामुळे भारताने सुखोईंची ही नवी स्क्वॉड्रन दक्षिणेत तैनात केली आहे.









