युवा सलामीवीर शुभमन गिलचा सहकाऱयांसह कसून सराव, बॉक्सिंग डे कसोटीला शनिवारपासून प्रारंभ, पृथ्वी शॉला डच्चू मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था / मेलबर्न
पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभव विसरुन ताज्या दमाने मैदानात उतरु पाहणाऱया भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी दुसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने तयारीला सुरुवात केली. हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी बुधवारी कसून सराव केला. युवा सलामीवीर शुभमन गिलसह अन्य खेळाडू यावेळी सराव सत्रात दिसून आले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी दि. 26 डिसेंबरपासून एमसीजीवर खेळवली जाणार आहे.
शुभमन गिलने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी गुलाबी चेंडूवर खेळवल्या गेलेल्या सराव सामन्यात अनुक्रमे 43 व 65 धावांची दमदार खेळी साकारली. पण, यानंतरही त्याला ऍडलेड कसोटीसाठी संघात घेतले गेले नव्हते. बुधवारी आयोजित सराव सत्रात देखील गिल उत्तम फॉर्ममध्ये दिसून आला. गिलसमवेत मयांक अगरवालने कसून सराव केला. हे उभय फलंदाज सलामीचे पर्याय असू शकतात.
21 वर्षीय शुभमन गिल रणजी चषक स्पर्धेत पंजाबतर्फे सलामीला फलंदाजीला उतरत आला असून सध्या झगडत असलेल्या पृथ्वी शॉऐवजी त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ऍडलेडमधील पहिल्या कसोटीत शॉचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक ठरले. तो 2 डावात अनुक्रमे 0 व 4 अशा किरकोळ धावांवर बाद झाला. महान फलंदाज सुनील गावसकर यांचे पाठबळ लाभलेल्या केएल राहुलने देखील कसून सराव केला. याशिवाय, अष्टपैलू रवींद्र जडेजाची हजेरी लक्षवेधी होती. यापूर्वी कन्कशनला सामोरे जावे लागल्यानंतर तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता.
रवींद्र जडेजाचा प्रदीर्घ सराव
जडेजाने सराव सत्रात प्रदीर्घ काळ सौराष्ट्राचा संघसहकारी चेतेश्वर पुजाराला गोलंदाजी केली. नंतर पुन्हा तो फलंदाजीला आला. यामुळे बॉक्सिंग डे कसोटीतील त्याचे स्थान जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते. यापूर्वी गुलाबी चेंडूने खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांमध्येच खुर्दा झाला होता. आता नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे सर्व समीकरणे पालटून टाकण्याची जबाबदारी असेल.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सराव सत्रादरम्यान खेळाडूंना सूचना करताना दिसून आले. याशिवाय, त्यांनी ऋषभ पंतशी संवाद साधला. पंत साहापूर्वी सराव सत्रात फलंदाजीला उतरला होता. सराव सामन्यात 73 चेंडूत 103 धावांची आतषबाजी केलेल्या ऋषभ पंतला साहाऐवजी संधी मिळणार का, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
मोहम्मद शमी उर्वरित मालिकेतून बाहेर फेकला गेला असून मोहम्मद सिराज व नवदीप सैनीने शार्दुल ठाकुरसह अजिंक्य रहाणेला गोलंदाजी केली. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यादरम्यान युवा फलंदाज पृथ्वी शॉशी संवाद साधताना दिसून आले. ऍडलेडमधील निराशाजनक प्रदर्शनामुळे शॉला संघातील स्थान राखणेही कष्टप्रद झाले आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शनिवारपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्याचे सोनी टेन 1, सोनी टेन 3, सोनी सिक्स वाहिनींवरुन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
डेव्हिड वॉर्नर, सीन ऍबॉट दुसऱया कसोटी सामन्यातून बाहेर
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व जलद गोलंदाज सीन ऍबॉट दुखापतीमुळे व कोरोना प्रोटोकॉलमुळे भारताविरुद्ध शनिवारपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यातून बाहेर फेकले गेले आहेत. वॉर्नर धोंडशिरेच्या दुखापतीने त्रस्त आहे तर सीन ऍबॉट बायो-बबलमध्ये समाविष्ट नव्हता. सिडनीमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना तातडीने मेलबर्नला हलवले होते.
वनडे मालिकेदरम्यान धोंडशिरेची दुखापत झालेला वॉर्नर अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही. ऍबॉट दुखापतीतून सावरला. पण, मागील आठवडय़ात भारतावर 8 गडी राखून मात करणाऱया त्यांच्या संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. दुसऱया कसोटी सामन्यासाठी आणखी कोणताही खेळाडू समाविष्ट केला जाणार नाही. वॉर्नर व सीन ऍबॉट तिसऱया कसोटीसाठी संघात दाखल होतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यादरम्यान स्पष्ट केले. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, तिसरी कसोटी दि. 7 जानेवारीपासून खेळवली जाणे अपेक्षित आहे. पण, सिडनीतील परिस्थिती बिघडत चालली असल्याने यावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. सिडनीतील परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर तिसरी कसोटी रद्द करणे किंवा त्या ब्रिस्बेनला हलवणे इतकेच पर्याय क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर असणार आहेत.









