वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान भारत आणि फिनलँड यांच्यात होणारी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेची लढत 2021 सालापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. कोरोना महामारी परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आपल्या सर्व टेनिस स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये माद्रीदमध्ये होणाऱया फेडरेशन चषक सांघिक स्पर्धेतील अंतिम फेरीचा समावेश आहे.
डेव्हिस चषक स्पर्धेतील भारत आणि फिनलँड यांच्यातील विश्व गट-1 मधील ही लढत येत्या सप्टेंबरमध्ये फिनलँड येथे घेतली जाणार होती पण आता ही लढत पुढील वर्षीच्या पार्च किंवा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयटीएफने घेतला आहे. कोरोना संकटाचा जागतिक दर्जाच्या टेनिसपटूंनाही धक्का बसला आहे. सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिक, बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह तसेच सर्बियाचे कोरिक व ट्रोस्की यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. क्रोएशियाचा माजी टेनिसपटू इव्हानिसेव्हिक यालाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
आयटीएफने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा नव्या स्वरूपात खेळविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. एकूण 48 राष्ट्रीय संघांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून विश्व गट-1 आणि विश्व गट-2 मध्ये प्रत्येकी 24 संघांचा समावेश होता. या संघामधील सामने येत्या सप्टेबरमध्ये घेतले जाणार होते. पण आता कोरोना संकटामुळे सदर स्पर्धा 2021 सालापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेव्हिस चषक स्पर्धेतील पात्र फेरीच्या लढतीत भारताला क्रोएशियाकडून यापूर्वी हार पत्करावी लागली होती तर विश्व गट प्ले ऑफ लढतीत फिनलँडने मेक्सिकोवर मात केली होती.









