आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : युवा खेळाडूंचा कस लागणार
वृत्तसंस्था/ ढाका
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होत असून भारताची सलामीची लढत कोरियाशी होणार आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा असून आपली क्षमता सिद्ध करून दाखवण्याची संधी त्यांना या स्पर्धेतून मिळाली आहे.
2011 पासून या स्पर्धेची सुरुवात झाली असून भारताने आतापर्यंत तीन वेळा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली आहे. मलेशियातील क्वान्टन येथे 2016 मध्ये जिंकल्यानंतर 2018 मध्ये ओमानमधील मस्कत येथे झालेल्या मागील स्पर्धेत भारताने संयुक्त जेतेपद मिळविले होते. त्यामुळे भारताला हॅट्ट्रिक नोंदवण्याची संधी प्राप्त झाली आहे. मंगळवारी 14 रोजी भारताची सलामीची लढत कोरियाशी होणार आहे. त्यानंतर 15 रोजी बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना होईल. तिसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 17 डिसेंबरला झाल्यानंतर 19 रोजी आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या जपानविरुद्ध अखेरची लढत होईल. उपांत्य व अंतिम लढत अनुक्रमे 21 व 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगने चांगली सुरुवात करण्यावर भर दिला आहे. ‘कोरिया दर्जेदार संघ असून आमच्या आक्रमणाची गती कमी करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. 2017 मध्ये याच ठिकाणी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आमची त्यांच्याशी 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्हाला गाफील राहून चालणार नाही. बेसिक गोष्टी योग्य व अचूक होतील, यावर आम्ही भर देण्याची गरज आहे,’ असे तो म्हणाला.
या स्पर्धेचे महत्त्व विशद करताना तो म्हणाला, ‘टोकियो ऑलिम्पिकनंतर आमची ही पहिलीच स्पर्धा असल्याने आमच्यासाठी ती फारच महत्त्वाची आणि उपयुक्त ठरणारी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या हॉकी मोसमाचे चक्र सुरू होत आहे. याची सुरुवात चांगली झाली तर आमचा आत्मविश्वासही उंचावेल,’ असे त्याने स्पष्ट केले. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यांची कामगिरी चांगली होणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगताना तो म्हणाला की, ‘गेल्या ऑलिम्पिकसाठी संघाची तयारी सुरू होती, त्यामुळे गेल्या दोन वर्षात यातील काही खेळाडूंना फारशी संधी मिळाली नव्हती. ते बऱयाच काळापासून कठोर मेहनत घेत आहेत, यासाठी त्यांना या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे,’ असे त्याने सांगितले.
संघाच्या फिटनेसबाबत तो म्हणाला की, ‘आम्ही सर्वच खेळाडू चांगल्या शेपमध्ये असून भुवनेश्वरमधील शिबिरात आम्ही फिटनेसवरच जास्त लक्ष केंद्रित केले होते. गेल्या दोन वर्षांत इतर संघांनी कशाप्रकारे तयारी केली आहे, ते पाहण्यास आम्ही आतुर झालो आहे. ही स्पर्धा आमचीही कसोटी पाहणारी असेल,’ असे तो शेवटी म्हणाला. मस्कतमध्ये झालेल्या मागील स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे सामना होऊ न शकल्याने हा निर्णय घेतला गेला होता.









