मुंबई \ ऑनलाईन टीम
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील सत्ताधाऱ्यांना, भारत सरकारला आलेल्या अपयशावर लक्ष वेधत आंतरराष्ट्रीय स्तरावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पण, देशाची कोणत्याही प्रकारची बदनामी सहन केली जाणार नाही. या परिस्थितीमध्ये राजकारण विसरुन आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. विदेशी सोशल मीडिया, विदेशी मीडियात भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यातून भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावं हे योग्य नाही असं आम्ही सांगत होतो. देशभरातील लोक निवडणुकीच्या प्रचाराला आले. तेच लोक देशभर गेल्याने त्यांनी कोरोना फैलावला. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत होते. पण चित्रं वेगळं आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना फैलावला असं आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील, असा विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
Previous Articleसातारा : बाधित वाढ सुरूच; उच्चांक नसल्याचा दिलासा
Next Article गोकुळची निवडणूक होणारच








