प्रतिनिधी / पुणे
अखेरच्या षटकापर्यंत ‘रंग’लेल्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर सात धावांनी चित्तथरारक विजय मिळवत मालिका खिशात घातली. शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या यांनी फलंदाजीत, तर शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर यांनी गोलंदाजीत चमक दाखवत या जेतेपदात रंग भरले. दरम्यान, इंग्लंडच्या सॅम करण याची एकाकी झुंज निष्फळ ठरली.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. भारताने इंग्लंडसमोर 330 धावांचे लक्ष्य ठेवले हेते. अखेरपर्यंत इंग्लंडच्या संघाने कडवी झुंज दिली. मात्र अवघ्या सात धावांच्या फरकाने इंग्लंडला पराभव पत्करावा लागला. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो हे स्वस्तात बाद झाले. पहिल्या दोन्ही सामन्यात या दोघांनी शतकी सलामी दिली होती. पण आज भुवनेश्वरने आपल्या पहिल्याच षटकात रॉय ला त्रिफळाचीत केले. तो 14 धावा काढून बाद झाला. बेअरस्ट्रो ही स्वस्तात बाद झाला. तेव्हा इंग्लंडची धावसंख्या अवघी 28 होती. त्यानंतर स्टोक्स आणि मलान यांनी डाव सांभाळत धावसंख्या 68 पर्यत नेली. 68 धावा झाल्या असताना स्टोक्स बाद झाला. त्याला नटराजने फुलंटॉस बॉलवर बाद केले. त्यानंतर बटलरही स्वस्तात बाद झाला. त्याला ठाकुरने बाद केले. तेव्हा इंग्लंडची 4 बाद 95 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर लिविंगस्टोन आणि मलानने 150ची धावसंख्या पार करून दिली. 155 धावा झाल्या असताना लिविंगस्टनला ठाकुरने बाद केले. त्यानंतर मलानही 50 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार लावले.
इंग्लंडचे शेपूट वळवळले- सॅम करनची फटकेबाजी
भारत सामना सहज जिंकेल, असे वाटत असताना इंग्लंडच्या शेपटाने भारताला दमवले. इंग्लंडची धावसंख्या 200 असताना मोईन अलीही बाद झाला. त्यानंतर सॅम करनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने पहिल्यांदा आदिल रशीद बरोबर 57 धावांची भागीदारी केली. 257 धावा झाल्या असताना रशीद बाद झाला. त्याने 19 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या वूडबरोबरही करनने 60 धावांची भागीदारी केली. वूडने 14 धावा केल्या. एका बाजूने फटकेबाजी करत करनने भारतीयांचे हृदयाचे ठोके चुकवले होते. इंग्लंडला शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना वूड हार्दिकच्या थ्रोवर बाद झाला. नटराजने शेवटची ओवर चांगली टाकून करनला मोठे फटके मारण्यापासूनन रोखले आणि भारताने 7 धावांनी सामना जिंकून मालिका खिशात घातली.
भारताने प्रथम फलंदाजी करत 330 धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले. शिखर धवन (67), ऋषभ पंत (78) आणि हार्दिक पंड्या (64) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 48.2 षटकात सर्वबाद 329 धावा केल्या. भारत 50 षटकेही फलंदाजी करू शकला नाही. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. इंग्लंडने सलग तिसऱया सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले.
रोहित आणि शिखरने पहिल्या पॉवरप्लेचा फायदा घेत 65 धावा काढल्या. रोहित आणि शिखरने शतकी सलामी देऊन भारताला मोठय़ा धावसंख्येकडे वाटचाल करून दिली. पण, भारताची धावसंख्या 103 असताना रोहित बाद झाला. रोहित 37 बॉलमध्ये 37 धावा काढून बाद झाला. राशीदने त्याला गुगली टाकून बोल्ड केले. रोहित आज परत स्टार्ट घेऊन बाद झाला. त्यानंतर भारताच्या 117 धावा झाल्या असताना सेट झालेला धवनही बाद झाला. त्याने 67 धावा केल्या. त्यात त्याने 10 चौकार लगावले. त्यालाही राशीदने बाद केले. राशीदने आपल्याच बॉलिंगवर त्याचा सुरेख कॅच घेतला. यानंतर विराटही लगेच 7 धावा काढून बाद झाला. मोईन आलीने त्याचा अडसर दूर केला. त्यामुळे भारताची 3 बाद 121 अशी अवस्था झाली. त्यानंतर आलेल्या व पहिल्या दोन्ही सामन्यात फॉर्मात असलेला राहुलही या सामन्यात मात्र चमक दाखवू शकला नाही. त्याला केवळ 7 धावाच करता आल्या. त्यावेळी भारताच्या 157 धावा झाल्या होत्या.
पंत आणि हार्दिकची आक्रमक फलंदाजी
राहुल बाद झाल्यावर आलेल्या हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. भारताच्या 256 धावा झाल्या असताना पंत बाद झाला. त्याने 62 बॉलमध्ये 78 धावा केल्या. त्यात 5 चौकार आणि 4 षटकार आहेत. हार्दिक आणि पंतने पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. भारताची धावसंख्या 276 असताना हार्दिकही बाद झाला. त्याने 64 धावा केल्या. त्यात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्याने भारताला 50 षटके खेळता आली नाहीत. इंग्लंडकडून मार्क वूडने 3 बळी घेतले, तर, रशीदने 2 बळी घेतले. करन, टॉपली, मोईन अली, लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळाला.









