सामनावीर रविंद्र जडेजाचे 9 बळी, अश्विनचा विक्रम
वृत्तसंस्था/ मोहाली
सामनावीर रविंद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी (नाबाद 175 धावा व 9 बळी) आणि अश्विनचा भेदक मारा यांच्या बळावर भारताने येथे झालेल्या पहिल्या कसोटीत तिसऱयाच दिवशी लंकेवर एक डाव 222 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
भारताने 8 बाद 574 धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर लंकेचा पहिला डाव 174 धावांत गुंडाळला आणि फॉलोऑन मिळाल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 178 धावांत संपुष्टात आणत भारताने दणदणीत विजय साकार केला. तिसऱया दिवशी भारताने 125 षटकांत एकूण 16 बळी मिळविले. पहिल्या डावात लंकेला जडेजाच्या वैयक्तिक धावांइतक्याही धावा जमविता आल्या नाहीत तर दुसऱया डावात त्याच्यापेक्षा फक्त तीन धावा जास्त जमविल्या. लंकेच्या पहिल्या डावात पथुम निसांकाने नाबाद 61 धावा जमविल्या तर चरिथ असालंकाने 29 व करुणारत्नेने 28 धावा केल्या. रविंद्र जडेजाने 41 धावांत 5, बुमराह, अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. दुसऱया डावातही फक्त निरोशन डिक्वेलाने नाबाद अर्धशतकी (51) खेळी केली. इतरांकडून त्याला साथ मिळू शकली नाही. धनंजया डिसिल्वाने 30, मॅथ्यूजने 28, करुणारत्नेने 27 धावा केल्या. या डावात भारतातर्फे जडेजा व अश्विन यांनी प्रत्येकी 4, शमीने 2 बळी मिळविले. दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरी कसोटी बेंगळूरमध्ये 12 मार्चपासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून भारत कसोटी चॅम्पियनशिपमधील पूर्ण 24 गुण मिळविण्याची अपेक्षा आहे.
जडेजा तिसरा भारतीय
भारताने पहिल्या दिवशी 357 धावा जमविल्या त्यावेळीच लंकेच्या आव्हानातील चुरस संपली होती. जडेजाने तर त्यांच्या गोलंदाजांवर मनमानी हल्ला केला. 60 वर्षाच्या खंडानंतर भारतीय खेळाडूने एकाच कसोटीत 150 हून अधिक धावा व पाचहून अधिक बळी मिळविले आहेत. यापूर्वी विनू मंकड यांनी 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर, पॉली उम्रिगर यांनी 1962 मध्ये दिल्ली कसोटीत विंडीजविरुद्ध यांनी असा दुर्मीळ पराक्रम केला होता. रविंद जडेजा हा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.
रविंद्र जडेजा सहावा खेळाडू
दीडशेहून अधिक धावा व पाचहून अधिक बळी अशी एकाच सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा हा क्रिकेटविश्वातील सहावा क्रिकेटपटू बनला आहे. जडेजाने लंकेविरुद्धच्या पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी केली. त्यानंतर पहिल्या डावात 5 व दुसऱया डावात 4 असे एकूण 9 बळी मिळविले. याआधी विनू मंकड, डेनिस ऍटकिन्सन, पॉली उम्रिगर, गॅरी सोबर्स, पाकचे मुश्ताक मोहम्मद यांनी असा पराक्रम केला होता.
अश्विन बनला सर्वाधिक बळी मिळविणारा दुसरा भारतीय गोलंदाज
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन रविवारी भारतातर्फे सर्वाधिक कसोटी बळी मिळविणारा दुसरा गोलंदाज बनताना महान खेळाडू कपिलदेवला मागे टाकले. 35 वर्षीय अश्विनने या सामन्याआधी 429 बळी मिळविले होते. लंकेच्या पहिल्या डावात त्याने 2 बळी मिळविले तर दुसऱया डावात आणखी 4 बळी मिळवित कपिलदेवला मागे टाकले. कपिलने 434 बळींचा टप्पा 131 कसोटीत गाठला होता तर अश्विनने 85 व्या कसोटीतच हा टप्पा पार केला. असालंका हा त्याचा 435 वा बळी ठरला. चारशेहून अधिक बळी मिळविणारा तो भारताचा चौथा गोलंदाज आहे. महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने सर्वाधिक 619 बळी नोंदवले आहेत. जगभरात सर्वाधिक बळी मिळविणारा अश्विन हा नववा गोलंदाज आहे. न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली (431), लंकेचा रंगना हेराथ (433) यांनाही त्याने मागे टाकले.
सर्वाधिक बळी मिळविणारे भारतीय गोलंदाज
बळी गोलंदाज
619 अनिल कुंबळे
436 आर. अश्विन
434 कपिलदेव
417 हरभरजन सिंग
311 झहीर खान.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 8 बाद 574 डाव घोषित, लंका प.डाव 174 (निसांका 61, असालंका 29, करुणारत्ने 28, जडेजा 5-41, अश्विन 2-49, बुमराह 2-36), फॉलोऑननंतर दुसरा डाव सर्व बाद 178 (मॅथ्यूज 28, डीसिल्वा 30, करुणारत्ने 27, असालंका 20, डिक्वेला नाबाद 51, अश्विन 4-47, जडेजा 4-46, शमी 2-48).









