ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरीदेखील देशात अद्याप समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही. तसे झाल्याचे पुरावेही आपल्याकडे नाहीत, असे केंद्रीय आरोग्य विभाग आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे.
देशात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली नसली तरीदेखील सांभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व बाबींसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्याराज्यांत कोरोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालये, कृत्रिम श्वसनयंत्रांची खरेदी तसेच रेल्वे-सैन्य दलाच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेण्याची योजना आखण्यात आली आहे.
तसेच कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये राखीव ठेवण्याची तसेच रूग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवण्याची सूचना केंद्राने सर्व राज्यांना केली आहे. सैन्य दलानेही कोरोना रुग्णांसाठी आपली 28 रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. याशिवाय सैन्य दलाच्या पाच रुग्णालयांत रुग्णांच्या चाचण्या करण्याची सुविधा आहे. तर भारत इलेक्ट्रॉनिक लि. कंपनीवर व्हेंटिलेटर निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.