पहिल्यांदाच देशातील 18 युटय़ूब चॅनेल्सवर कारवाई : 4 पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या माहिती-प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी 22 युटय़ूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. यात पाकिस्तानातून कार्यरत 4 युटय़ूब न्यूज चॅनेल्सचा समावेश आहे. पाकिस्तानशी संबंधित दुनिया मेरे आगे, गुलाम नबी मदनी, हकीकत टीव्ही, हकीकत टीव्ही 2.0 यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व नेटवर्क खोटय़ा बातम्या फैलावून भारतीयांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने चालविली जात होती.
याचबरोबर 3 ट्विटर अकौंट, एक फेसबुक अकौंट आणि एका न्यूज वेबसाइटलाही ब्लॉक करण्यात आले आहे. ही चॅनेल्स भारताची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि अन्य देशांसोबतच्या संबंधांबद्दल दुष्प्रचार करत होती, असे सरकारकडून सांगण्यात आले. आयटी नियम 2021 च्या अंतर्गत पहिल्यांदाच 18 भारतीय युटय़ूब न्यूज चॅनेल्सवरही कारवाई करण्यात आली आहे.
ब्लॉक केलेली भारतीय युटय़ूब चॅनेल्स
एआरपी न्यूज, एओपी न्यूज, एलडीसी न्यूज, सरकारीबाबू, एसएस झोन हिंदी, स्मार्ट न्यूज, न्यूज23हिंदी, ऑनलाईन खबर, डीपी न्यूज, पीकेबी न्यूज, किसानतक, बोराना न्यूज, सरकारी न्यूज अपडेट, भारत मौसम, आरजे झोन 6, एक्झाम रिपोर्ट, डिजी गुरुकुल, दिनभरकीखबरें या युटय़ूब चॅनेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.
फेब्रुवारीतही झाली होती कारवाई यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सरकारने 35 युटय़ूब चॅनेल्स, 2 ट्विटर अकौंट, 2 इन्स्टाग्राम अकौंट, 2 वेबसाइट्स आणि एक फेसबुक अकौंट ब्लॉक करण्यात आले आहे. ही कारवाई आयटी नियमांच्या अंतर्गत करण्यात आली आहे. ही सर्व अकौंट्स पाकिस्तानातून हाताळली जात होती. तर डिसेंबर महिन्यात सरकारने 20 युटय़ूब चॅनेल्स आणि दोन वेबसाइट्सना ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता









