मोहम्मद शमी-जडेजा यांचे प्रत्येकी 3 बळी, केएल राहुलचे 19 चेंडूत 50 धावांचे योगदान
दुबई / वृत्तसंस्था
मोहम्मद शमी व रविंद्र जडेजा यांनी गोलंदाजीत तर त्यापूर्वी केएल राहुल, रोहित शर्मा यांनी फलंदाजीत उत्तम वरचष्मा गाजवल्यानंतर भारताने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी स्कॉटलंडचा 8 गडी राखून फडशा पाडला. प्रारंभी, स्कॉटलंडचा डाव अवघ्या 85 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने प्रत्युत्तरात 6.3 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयासह भारताने दुसऱया गटातील गुणतालिकेत 4 गुणांसह तिसऱया स्थानी झेप घेतली. मात्र, यानंतरही संघाचे स्पर्धेतील आव्हान अफगाण-न्यूझीलंड लढतीवर अवलंबून असणार आहे.
स्कॉटलंडविरुद्ध विजयासाठी 86 धावांची आवश्यकता असताना भारतीय सलामीवीरांनी या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक साजरे केले. राहुल व रोहित यांनी जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडत 5 षटकातच 70 धावांची आतषबाजी केली. ब्रॅडली व्हीलने रोहितला 30 धावांवर बाद केले. मात्र, तोवर भारत विजयाच्या समीप पोहोचला होता. केएल राहुल दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर विराट कोहली व सुर्यकुमार यादव यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

तत्पूर्वी, पहिले 2 बळी पॉवर प्ले षटकातच गमावल्याने स्कॉटलंडची अतिशय खराब सुरुवात झाली आणि त्यानंतर ते यातून अजिबात सावरु शकले नाहीत. शमी व जडेजा यांनी प्रत्येकी 3 बळी घेत स्कॉटलंडच्या डावाला सुरुंग लावला. त्यांचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. जॉर्ज मन्सी व मायकल लिस्क यांनी अनुक्रमे 24 व 21 धावांचे योगदान दिले.
धावफलक
स्कॉटलंड ः जॉर्ज मन्सी झे. पंडय़ा, गो. शमी 24 (19 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), काईल कोएत्झर त्रि. गो. बुमराह 1 (7 चेंडू), मॅथ्यू क्रॉस पायचीत गो. जडेजा 2 (9 चेंडू), रिची बेरिंग्टन त्रि. गो. जडेजा 0 (5 चेंडू), कॅलम मॅकलिओड त्रि. गो. शमी 16 (28 चेंडू), मायकल लिस्क पायचीत गो. जडेजा 21 (12 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ख्रिस ग्रीव्हज झे. पंडय़ा, गो. अश्विन 1 (7 चेंडू), मार्क वॅट त्रि. गो. बुमराह 14 (13 चेंडूत 2 चौकार), सफ्यान शरीफ धावचीत (बदली खेळाडू इशान किशन) 0 (1 चेंडू), इव्हान्स त्रि. गो. शमी 0 (1 चेंडू), ब्रॅड व्हील नाबाद 2 (4 चेंडू). अवांतर 4. एकूण 17.4 षटकात सर्वबाद 85.
गडी बाद होण्याचा क्रम
1-13 (कोएत्झर, 2.3), 2-27 (जॉर्ज, 5.2), 3-28 (बेरिंग्टन, 6.3), 4-29 (क्रॉस, 6.6), 5-58 (लिस्क, 11.2), 6-63 (ग्रीव्हज, 13.4), 7-81 (कॅलम, 16.1), 8-81 (शरीफ, 16.2), 9-81 (इव्हान्स, 16.3), 10-85 (मार्क वॅट, 17.4).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 3.4-1-10-2, वरुण चक्रवर्ती 3-0-15-0, अश्विन 4-0-29-1, शमी 3-1-15-3, रविंद्र जडेजा 4-0-15-3.
भारत ः केएल राहुल झे. मॅकलिओड, गो. वॅट 50 (19 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), रोहित शर्मा पायचीत गो. व्हील 30 (16 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), विराट कोहली नाबाद 2 (2 चेंडू), सुर्यकुमार यादव नाबाद 6 (2 चेंडूत 1 षटकार). अवांतर 1. एकूण 6.3 षटकात 2 बाद 89.
गडी बाद होण्याचा क्रम
1-70 (रोहित, 4.6), 2-82 (केएल राहुल, 5.6).
गोलंदाजी
मार्क वॅट 2-0-20-1, ब्रॅड व्हील 2-0-32-1, इव्हान्स 1-0-16-0, शरीफ 1-0-14-0, ख्रिस ग्रीव्हज 0.3-0-7-0.
बुमराहच्या खात्यावर टी-20 क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक बळी
जलद गोलंदाज जसप्रित बुमराने टी-20 क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक बळींचा नवा विक्रम नोंदवला. बुमराहने मार्क वॅटला डावातील 18 व्या षटकात बाद करत स्कॉटलंडचा डाव संपुष्टात आणला आणि इथेच चहलचा 63 बळींचा विक्रम मागे टाकला. टी-20 क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन 55 बळींसह तिसऱया स्थानी आहे.









