नवी दिल्ली / वृत्तसंस्था
श्रीलंका हा शेजारी देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच भारताने त्याला मदत म्हणून 90 कोटी डॉलर्स इतके कर्ज देण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसातील बदलत्या परिस्थितीमुळे श्रीलंकेची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली आहे. अशा स्थितीत देश दिवाळखोरीचा सामना करत आहे. देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने श्रीलंकेला 90 कोटी डॉलर्स कर्ज स्वरुपात देण्याची तयारी दर्शवली आहे.
श्रीलंकेचे मुख्य अर्थतज्ञ आणि श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर डब्ल्यू. ए. विजयवर्धने यांनी भारताच्या मदतीचे कौतुक केले असून भारताच्या या आर्थिक मदतीमुळे श्रीलंकेचे बुडणारे जहाज सध्यातरी वाचले असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत इशाराही दिला.









