तिसऱया वनडेतही विंडीजला 96 धावांनी नमवले, मालिकेत 3-0 फरकाने एकतर्फी बाजी
अहमदाबाद / वृत्तसंस्था
भारतीय वनडे कर्णधार या नात्याने रोहित शर्माची कारकीर्द विंडीजविरुद्ध एकतर्फी मालिकाविजयाने सुरु झाली. भारताने तिसऱया व शेवटच्या वनडे लढतीतही 96 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला आणि ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकत विंडीजचा व्हॉईटवॉश केला. भारताने 50 षटकात सर्वबाद 265 धावा जमवल्यानंतर प्रत्युत्तरात विंडीजचा डाव अवघ्या 37.1 षटकात 169 धावांमध्येच खुर्दा झाला. 111 चेंडूत 80 धावा फटकावणारा श्रेयस अय्यर सामनावीर तर लक्षवेधी, भेदक गोलंदाजी साकारणारा प्रसिद्ध कृष्णा मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. उभय संघात आता 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
2023 वनडे वर्ल्डकप नजरेसमोर ठेवत भारतीय संघव्यवस्थापनाने नवोदित, युवा गोलंदाजांना आजमावण्यावर भर दिला आणि प्रसिद्ध कृष्णा या स्ट्राईक बॉलरने संधीचा उत्तम लाभ घेतल्याचे त्याच्या कामगिरीवरुन दिसून आले. या मालिकेत त्याने 9 बळी घेतले. तिसऱया वनडेत न खेळलेल्या दीपक हुडाने मालिकेत उत्तम कामगिरी साकारली. सुर्यकुमार यादवने देखील आवश्यकतेनुसार आपण आपल्या आक्रमक फलंदाजी शैलीला मुरड घालू शकतो, याचा येथे प्रत्यय आणून दिला.

मनगटी फिरकीपटू यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना एकत्रित संधी मिळाली नाही. पण, वैयक्तिक स्तरावर त्यांनी लक्षवेधी योगदान दिले. विंडीजचा संघ पूर्ण मालिकेत भारताला अगदी एकदाही प्रबळ आव्हान देऊ शकला नाही, हे सातत्याने अधोरेखित झाले.
शुक्रवारी, तिसऱया व शेवटच्या सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकांचा कोटा पूर्ण करत सर्वबाद 265 धावा नोंदवल्या. श्रेयस अय्यर व रिषभ पंत (54 चेंडूत 56) यांनी 110 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. त्यापूर्वी संघाची एकवेळ 3 बाद 42 अशी बिकट स्थिती होती.
कोरोनावर मात केल्यानंतर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या मुंबईकर श्रेयसने प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला. त्याने डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू फटकावत एकेरी धावेसह कारकिर्दीतील नववे अर्धशतक साजरे केले. पंतने देखील एकेरी धावेवरच पाचवे वनडे अर्धशतक फटकावले. मात्र, 30 व्या षटकात तो हेडन वॉल्शचा (2-59) पहिला बळी ठरला तर सुर्यकुमार यादव (6) देखील स्वस्तात परतला. श्रेयसने 38 व्या षटकात लाँगऑफवरील ब्रेव्होकडे झेल देण्यापूर्वी 9 चौकार नोंदवले.
चहर (38) व वॉशिंग्टन सुंदर (33) यांनी सातव्या गडय़ासाठी 53 धावांची भागीदारी साकारली आणि यामुळे भारताला 260 धावांचा टप्पा पार करता आला. डावाच्या प्रारंभी रोहित शर्मा (13), विराट (0) मात्र स्वस्तात बाद झाल्याने भारताची 2 बाद 16 अशी खराब सुरुवात झाली होती. शिखर धवनही 10 धावांवरच तंबूत परतला होता.
विंडीजची पुन्हा निराशा
विजयासाठी 266 धावांचे आव्हान असताना विंडीजचा संघ पुन्हा एकदा 50 षटकांचा कोटा पूर्ण करण्यापासून कित्येक कोस दूर राहिला. त्यांचा पूर्ण डाव 37.1 षटकातच खुर्दा झाला. ओडियन स्मिथने सर्वाधिक 36, कर्णधार निकोलस पूरनने 34 व अल्झारी जोसेफने 29 धावांचे योगदान दिले. भारतातर्फे सिराज (3-29), प्रसिद्ध कृष्णा (3-27) यांनी प्रत्येकी 3 तर दीपक चहर (2-41), कुलदीप (2-51) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा त्रि. गो. जोसेफ 13 (15 चेंडूत 3 चौकार), शिखर धवन झे. होल्डर, गो. स्मिथ 10 (26 चेंडूत 1 षटकार), विराट कोहली झे. होप, गो. जोसेफ 0 (2 चेंडू), श्रेयस अय्यर झे. ब्रेव्हो, गो. वॉल्श 80 (111 चेंडूत 9 चौकार), रिषभ पंत झे. होप, गो. वॉल्श 56 (54 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), सुर्यकुमार यादव झे. ब्रूक्स, गो. ऍलन 6 (7 चेंडूत 1 चौकार), वॉशिंग्टन सुंदर झे. स्मिथ, गो. होल्डर 33 (34 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), दीपक चहर झे. होप, गो. होल्डर 38 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), कुलदीप यादव झे. होप, गो. होल्डर 5 (8 चेंडू), मोहम्मद सिराज त्रि. गो. होल्डर 4 (6 चेंडूत 1 चौकार), प्रसिद्ध कृष्णा नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 20. एकूण 50 षटकात सर्वबाद 265.
गडी बाद होण्याचा क्रम
1-16 (रोहित, 3.3), 2-16 (विराट, 3.5), 3-42 (धवन, 9.3), 4-152 (रिषभ, 29.6), 5-164 (सुर्यकुमार, 32.3), 6-187 (श्रेयस, 37.1), 7-240 (दीपक चहर, 45.4), 8-250 (कुलदीप, 47.4), 9-261 (वॉशिंग्टन, 49.4), 10-265 (सिराज, 49.6).
गोलंदाजी
रोश 7-0-39-0, जोसेफ 10-1-54-2, ओडियन 7-0-36-1, होल्डर 8-1-34-4, ऍलन 8-0-42-1, हेडन वॉल्श 10-0-59-2.
विंडीज ः शाय होप पायचीत गो. सिराज 5 (9 चेंडूत 1 चौकार), ब्रेन्डॉन किंग झे. यादव, गो. चहर 14 (13 चेंडूत 2 चौकार), डॅरेन ब्रेव्हो झे. कोहली, गो. प्रसिद्ध कृष्णा 19 (30 चेंडूत 3 चौकार), ब्रूक्स झे. अय्यर, गो. चहर 0 (3 चेंडू), निकोलस पूरन झे. शर्मा, गो. कुलदीप 34 (39 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जेसॉन होल्डर झे. शर्मा, गो. प्रसिद्ध कृष्णा 6 (12 चेंडूत 1 चौकार), फॅबियन ऍलन झे. पंत, गो. कुलदीप 0 (1 चेंडू), अल्झारी जोसेफ झे. कोहली, गो. प्रसिद्ध कृष्णा 29 (56 चेंडू), ओडियन स्मिथ झे. धवन, गो. सिराज 36 (18 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), हेडन वॉल्श झे. शर्मा, गो. सिराज 13 (38 चेंडूत 1 चौकार), केमर रोश नाबाद 0 (4 चेंडू). अवांतर 13. एकूण 37.1 षटकात सर्वबाद 169.
गडी बाद होण्याचा क्रम
1-19 (शाय होप, 3.2), 2-25 (ब्रेन्डॉन, 4.3), 3-25 (ब्रूक्स, 4.6), 4-68 (डॅरेन ब्रेव्हो, 13.1), 5-76 (होल्डर, 15.6), 6-77 (ऍलन, 16.2), 7-82 (निकोलस, 18.3), 8-122 (ओडियन, 23.3), 9-169 (हेडन वॉल्श, 36.2), 10-169 (जोसेफ, 37.1).
गोलंदाजी
दीपक चहर 8-1-41-2, सिराज 9-1-29-3, प्रसिद्ध कृष्णा 8.1-1-27-3, कुलदीप 8-0-51-2, वॉशिंग्टन सुंदर 4-0-17-0.









