पाकिस्तानी विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांचे विधान
वृत्तसंस्था/ अबू धाबी
पाकिस्तानवर भारत सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचा दावा पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी शुक्रवारी केला आहे. यासंबंधी आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे कुरैशी यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला यासंबंधी माहीत मिळाल्याचा दावा अबू धाबी येथील पत्रकार परिषद केला आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या दोन दिवसीय दौऱयाच्या अखेरीस शाह यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. एका मोठी माहिती गुप्तचर यंत्रणांद्वारे मिळाली आहे. यानुसार भारत पाकिस्तानच्या विरोधात सर्जिकल स्ट्राइकची योजना आखत आहे. ही ‘धोकादायक घडामोड’ असल्याचे म्हणत कुरैशी यांनी भारत स्वतःच्या भागीदार देशांची यासंबंधी अनुकूल भूमिका प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे.
अंतर्गत मुद्दय़ांवरून लोकांचे लक्ष विलचित करण्यासाठी भारत सर्जिकल स्ट्राइक करू पाहतोय असा आरोपही त्यांनी केला आहे. तर भारतीय कारवाईच्या भीतीपोटी पाकिस्तानी सैन्याने चालू महिन्याच्या प्रारंभी अतिदक्षता लागू केली होती.
पाकिस्तानवर नाराज युएई
संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानी नागरिकांना कामकाजाचा व्हिसा देणे बंद केले आहे. कोरोना संक्रमण आणि वाढत्या गुन्हय़ांमागे पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याने युएईच्या सरकारने हे पाऊल उचलले आहे. युएईने पाकिस्तानला भरभक्कम कर्ज दिले होते. या कर्जाच्या परतफेडीकरता पाकिस्तानला चालू महिन्याच्या अखेरपर्यंत 1 अब्ज डॉलर्स युएईला परत करावे लागणार आहेत.









