युरोप दौऱयातील पहिला हॉकी सामना
वृत्तसंस्था/ क्रेफेल्ड, जर्मनी
कोरोना महामारीच्या दीर्घ ब्रेकनंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने युरोप दौऱयातील पहिल्याच सामन्यात जर्मनीचा 6-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित दिमाखात आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले. युवा खेळाडू विवेक सागर प्रसादने दोन गोल नोंदवले.
विवेक प्रसाद (27, 28 वे मिनिट), निलकांता शर्मा (13), ललित कुमार उपाध्याय (41), आकाशदीप सिंग (42), हरमनप्रीत सिंग (47) यांनी भारताचे गोल नोंदवले. विजयाच्या दृढनिर्धारानेच भारतीय खेळाडू मैदानात उतरल्याचे दिसत होते. प्रारंभापासूनच त्यांनी आक्रमणास सुरुवात करीत जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणले आणि पहिल्या सत्रातील तेराव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविण्यात भारताला यशही आहे. त्यावर मिडफिल्डर निलकांता शर्माने गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र भारताला ही आघाडी फारवेळ टिकविता आली नाही. पुढच्याच मिनिटाला कॉन्स्टन्टिन स्टाएबने गोल नोंदवून जर्मनीला बरोबरी साधून दिली. जर्मनीसाठी हा एकमेव गोल ठरला. कारण भारतीयांनी त्यांना शेवटपर्यंत गोल नोंदवण्याची अजिबात संधी दिली नाही.
दुसऱया सत्रात जर्मनीने भारताला दडपणाखाली आणले आणि सुरुवातीलाच लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. मात्र भारतीय खेळाडूंनी अप्रतिम बचाव करून त्यांच्या या संधी वाया घालविल्या आणि प्रतिआक्रमण करीत दोन गोलही नोंदवले. विवेक सागर प्रसादने 27 व 28 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले. तिसऱया सत्रातही यजमानांनी जोरदार सुरुवात केली आणि तब्बल सहा पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. मात्र कर्णधार व गोलरक्षक पीआर श्रीजेशने अप्रतिम गोलरक्षण करीत जर्मनीला त्यातील एकाही पेनल्टी कॉर्नरवर यश मिळू दिले नाही.
भक्कम बचावाचे प्रदर्शन केल्यानंतर भारतीय आघाडीवीर ललित व आकाशदीप यांनी अनुक्रमे 41 व 42 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. 47 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात आणखी एक सुवर्णसंधी मिळाली. त्यावर हरमनप्रीतने जबरदस्त फ्लिकवर गोल नोंदवत आघाडी आणखी वाढविली. दडपण वाढल्याने यजमान संघाने जोरदार प्रयत्न केले. त्यांनी गोलरक्षकालाही आक्रमणात आणले. पण भारताने अप्रतिम बचाव करीत त्यांना यश मिळू न देता 6-1 विजयावर शिक्कामोर्तब केला. ‘दीर्घ कालावधीनंतर खेळण्याचा रोमांचक अनुभव होता हा. प्रशिक्षकांनी खेळाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आणि आम्ही तो अमलात आणला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये यजमानांचा हाच संघ खेळला होता. सुमारे वर्षभराच्या खंडानंतर प्रथमच खेळताना त्यांच्याविरुद्ध आम्ही खूप चांगले प्रदर्शन केले, असे मला वाटते. आम्ही शिबिरात वैयक्तिक कौशल्य वाढविण्यावर आणि जर्मनीविरुद्धच्या डावपेचांची योजना आखली होती. ती या सामन्यात परिपूर्णतेने अमलात आणणे जरूरीचे होते आणि आम्ही ते साध्य करीत यश मिळविले,’ असे कर्णधार व गोलरक्षक पीआर श्रीजेश म्हणाला. मंगळवारी 2 रोजी याच संघाविरुद्ध दुसरा सामना होणार आहे









