नवी दिल्ली : भूमीवरून आकाशातील लक्ष्यावर वेगवान मारा करणाऱया (क्यूआरएसएएम) श्रेणीतील अत्याधुनिक क्षेपणास्त्राचे परीक्षण भारताकडून करण्यात आले आहे. संपूर्णपणे भारत निर्मित असणाऱया या क्षेपणास्त्राने आकाशातील मानवरहित विमानाचा अचूक भेद केला. या क्षेपणास्त्राचा मारक टप्पा 30 किलोमीटर इतका आहे. आता या क्षेपणास्त्राचे व्यापारी तत्वावर उत्पादन केले जाणार आहे.
शुक्रवारी दोन प्रहरी 3 वाजून 50 मिनीटांनी ओडीशाजवळच्या सागरतटीय प्रदाशात हे परीक्षण करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे इंधन घनस्वरूप आहे.
आकाशातींल लक्ष्ये स्वतःच निवडून त्यांचा भेद करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये भारताकडून विविध क्षेपणास्त्रांची 12 परीक्षणे करण्यात आली आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा हा प्रयत्न आहे.









