एकाही राजकीय पक्ष, संघटनेचा अर्ज नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शेतकऱयांच्या होत असलेल्या आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर काँगेससहित विरोधी पक्षांनी 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ बाबत रत्नागिरी जिह्यात संभ्रमावस्था आह़े या आंदोलनाबाबत पोलिसांकडे कोणत्याही राजकीय पक्षाने अर्ज केलेला नाह़ी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आह़े काही संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असला तरीही बंदमध्ये सहभागी होत असल्याची अधिकृत भूमिका कोणत्याही संघटनेने जाहीर केलेले नाही.
केंद्र सरकारकडून संसदेत मांडण्यात आलेल्या तीन कृषी विधेयकांना अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आह़े यासंदर्भात शेतकरी संघटनांची शासनाशी चर्चा सुरु आहे. मात्र शेतकरी संघटना विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने तिढा कायम आह़े या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस व विरोधी पक्षांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिली आह़े मात्र याबाबत रत्नागिरी जिह्यात राजकीय पक्षांनी कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी मधील व्यापारी, नागरिक व उद्योजक यांच्यामध्ये या बंदबाबत संभ्रम आह़े या बंदसाठी जिह्यात कोणत्याही संघटनेकडून पुढाकार घेतलेला नाह़ी पोलीस यंत्रणेकडेही आंदोलनाच्या परवानगीबाबत कोणत्याही संघटनांकडून अर्ज करण्यात आलेली नाह़ी त्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
जिल्हा काँग्रेसचे आज धरणे आंदोलन
केंद्रातील मोदी सरकारने शेती व शेतकऱयांविरोधात मोठे षडयंत्र रचले असून या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्या वतीने 8 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी दिली.
भाजप सरकारने काळय़ा कायद्यांच्या माध्यमातून देशातील हरितक्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. देशातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असून 400 शेतकरी संघटनांसह सर्व विरोधी पक्षांनी मंगळवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेसने पाठिंबा दिला असून त्यानुसार धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, प्रंट व सेल अध्यक्ष यांनी स्थानिक पातळीवर बंदमध्ये सहभागी होण्याचे व्यापारी संघटनांसह नागरिकांना आवाहन करावे.
भारत बंदबाबत शिवसैनिकांना पक्ष स्तरावरुन आदेश नाहीत
देशभरात आज भारत बंदची हाक देण्यात आलेली असली तरी या बंदसाठी जिल्हय़ातील शिवसैनिकांना पक्ष स्तरावरुन सोमवारी सांयकाळी पर्यंत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते. आंदोलनासाठी शिवसेनेकडून कोणती भूमिका घेतली जाणार याची प्रतीक्षा लागून राहीली होती. मात्र याबाबत पक्षस्तरावरुन आदेश प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात आले. बंदबाबत सेनेचे वरीष्ठ पदाधिकारी भूमिका स्पष्ट करतील असे शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले.
कर्मचारी कामगार संघटनेचा पाठिंबा
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला कर्मचारी कामगार संघटनेचा पाठिंबा असल्याचे संघटनेचे नेते सुधाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आह़े कोरोना काळात केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयके संसदेत मंजूर करून घेतल्याचा आरोप सावंत यांनी केला आह़े
एसटी बससेवा सुरू राहणार
देशभरात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एसटी बससेवा सुरू राहणार असल्याचे रत्नागिरी एसटी विभागाकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास परिस्थितीचा आढावा घेवून पुढील निर्णय घेतला जाईल असे एसटीच्या अधिकाऱयांनी सांगितले आह़े
रत्नागिरीत पाठिंबा मात्र बाजारपेठ सुरू
शेतकऱयांच्या आंदोलनाला रत्नागिरी व्यापारी संघाचा पाठिंबा मात्र बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे संघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी सांगितले आह़े दुकाने बंद ठेवण्याबाबतचा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला आह़े ज्यांना बंद मध्ये सहभागी व्हायचे आहे ते सहभागी होवू शकतात मात्र कुणावरही दुकाने बंद ठेवण्याची सक्ती नसल्याची माहिती पेठे यांनी दिली आह़े
खेड बाजारपेठ सुरुच राहणार
शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र मंगळवारी शहर व्यापारी संघटनेचा कोणताही बंद नसून नेहमीप्रमाणे बाजारपेठ व सर्व व्यवहार सुरळीत राहणार असल्याचे शहर व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे.









