प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रेन्सन यांच्या चमूमध्ये समावेश
न्यू मेक्सिको, हैदराबाद / वृत्तसंस्था
कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांच्यानंतर आता सिरिशा बंदाला ही आणखी एक भारतकन्या अंतराळ प्रवास करणार आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांची अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळ यान व्हर्जिन ऑर्बिटमध्ये बसून सिरिशा अंतराळयात्रेवर जाईल. रिचर्ड यांच्यासोबत अंतराळ प्रवासासाठी अन्य पाच जण जात आहेत. धोकादायक अशा अंतराळ प्रवासाला जाणारी भारतात जन्मलेली सिरिशा ही दुसरी महिला आहे. सिरिशा बांदला सध्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीमध्ये सरकारी कामकाज आणि संशोधन कार्याशी संबंधित अधिकारी आहे. ती मूळची आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील रहिवासी आहे.
11 जुलैला व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रेन्सन अंतराळ सफरीसाठी रवाना होत आहेत. सदर अंतराळ यान न्यू मेक्सिको येथून उड्डाण करणार आहे. या यानाचे सर्व क्रू सदस्य कंपनीचे कर्मचारी असतील. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळात हे चौथे उड्डाण असेल. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय वंशाची सिरिशा बांदला देखील अंतराळात जाणार आहे. भारतातर्फे राकेश शर्मा सर्वप्रथम अंतराळात गेले होते. त्यांच्यानंतर कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या. तसेच भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी देखील अंतराळावर पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता सिरिशाच्या माध्यमातून भारताचे नाव चर्चेत आले आहे.
कमी वयात मोठी झेप
गेल्या सहा वर्षांत सिरिशाने व्हर्जिन गॅलॅक्टिकमध्ये उच्चपद मिळवले आहे. तिने एरोनॉटिकल/ऍस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. तसेच जॉर्जटाऊन विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. ती सध्या व्हर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन ऑपरेशनसुद्धा हाताळत आहे. याव्यतिरिक्त सिरीशा अमेरिकन अ?Ÿस्ट्रोनॉटिकल सोसायटी आणि फ्यूचर स्पेस लीडर फाउंडेशनच्या संचालक मंडळावर आहे. कमी वयात मोठी झेप घेणाऱया सिरिशाचे जगभरातून कौतुक होत आहे.
कौतुक अन् अभिनंदनाचा वर्षाव
तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (टीएएनए) या संस्थेशीही सिरिशा संलग्न आहे. ही उत्तर अमेरिकेतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी इंडो-अमेरिकन संस्था आहे. काही वर्षांपूर्वी या संस्थेने सिरिशाला युवा स्टार पुरस्काराने गौरविले होते. सिरिशा अंतराळात जाणार असल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर तिच्या अभिनंदनाच्या पोस्टचा पाऊस पडत आहे.









