शहर डीबीची कारवाई : चोरटय़ास सात दिवसांची कोठडी
प्रतिनिधी/ सातारा
येथील कणसे होंडा शोरूममधील कामगारानेच तब्बल 44 नव्या दुचाकी कादपत्रांमध्ये फेरफार करून परस्पर विकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी शशिकांत चांगदेव नलवडे (रा. धनगरवाडी, पो. कोडोली, सातारा) या कामगाराला शहर पोलीस ठाण्याच्या डीबी’ने अटक केली. त्याने गाडय़ा विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याने विकलेल्या 44 गाडय़ांपैकी 27 गाडय़ा जप्त केल्या आहेत. संशयिताला न्यायालयात हजार केले असता, सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये कणसे होंडा शोरूम आहे. या शोरूममध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी शशिकांत नलवडे हा काम करत होता. शोरूममध्ये गाडय़ा खरेदी करण्यासाठी येणाऱया नागरिकांना भेटून तो कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करत होता. त्यानंतर गोदामातील गाडय़ा तो फायानांस कंपनीने जप्त केल्याचे सांगत निम्म्या किमतीत नागरिकांना विकत होता.
दरम्यान, शोरूममध्ये गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी एक युवक शुक्रवारी (दि. 27 रोजी) आला होता. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या कागदपत्र आणि चेसी नंबरवरून शोरूममधील कर्मचाऱयांना शंका आली. तुम्ही ही गाडी कोणाकडून खरेदी केली, असे कर्मच्याऱयाने विचारले. त्यावेळी त्या नागरिकाने नलवडेचे नाव सांगितले. त्यानंतर शोरूममधील व्यवस्थापकांनी गोदामातील गाडय़ा मोजल्या असता त्यामध्ये 44 गाडय़ा नसल्याचे समोर आले.
आपल्याच कामगाराने मोठी अपरातफर केली असल्याचे समजताच शोरूममध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शोरूमचे व्यवस्थापक संग्राम संभाजीराव माने (रा. गोडोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने संशयिताच्या अटकेसाठी गोपनिय माहितीनुसार कोल्हापूर जिह्यातील बावडा या ठिकाणी सापळा लावत अटक केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मागदर्शनाखाली डीबी’चे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक फौजदार दशरथ कदम, हवालदार शिवाजी भिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी केली.









