पेठ वडगाव/प्रतिनिधी
भादोले गावच्या हद्दीत दुर्गुळे यांच्या शेतातील विहिरीत गेल्या सात दिवसापूर्वी आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ही मृत महिला कोडोली (ता.पन्हाळा) येथील सुजाता दिपक कापरे (वय३२) आहे. मृतदेह सापडलेल्या विहिरीपासून काही अंतरावर शेतकऱ्याला सापडलेल्या पर्समधील वस्तू व कागदपत्रावरून या महिलेची ओळख पटली आहे. दरम्यान, या मृत विवाहितेचे वडील आनंदा चौगुले (रा.मसूद माले, ता.पन्हाळा) यांनी मुलगी मृत सुजाताने तिचा पती दिपक पांडुरंग कापरे व सासरा पांडुरंग गुंडा कापरे या दोघांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ व जाचहाट केल्याने आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे.
या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, भादोले (ता.हातकणंगले) गावच्या हद्दीत अरविंद दुर्गुळे यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. याची वर्दी शेतमालकाने वडगाव पोलिसात दिली. वडगाव पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून या मृत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पारगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे सीपीआर रुग्णालयाने मृतदेह ठेवून घेतला नाही. या मृतदेहाचे दफन करण्यात आले. मृत महिलेचे कपडे व साहित्य, वर्णनावरून ओळख पटविण्यासाठी पोलीस गेल्या सात दिवसापासून प्रयत्न करत होते.
सुजाताने आत्महत्या केलेल्या विहिरीत शेताचे वाटेकरी यांना शनिवारी विहिरीपासून शंभर मीटर अंतरावर महिलेची पर्स आढळून आली. ही पर्स उघडून पहिली असता त्यामध्ये पतसंस्थेमध्ये पैसे भरलेल्या चीठ्या, बंद अवस्थेतील मोबाईल असे साहित्य सापडले. यावरून या मृत महिलेची ओळख पटली.
दरम्यान, आज या मृत विवाहितेच्या वडिलांनी तिचा पती व सासऱ्याच्या मानसिक व शारीरिक छळ व जाचहाट करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले आहे, मयत सुजाता हिचा विवाह गेल्या चार वर्षापूर्वी दिपक कापरे याच्याशी झाला. विवाहानंतर तिने पती व सासरा याने सुजाता हिने घर खर्च चालवावा तसेच तिने काम करून पैसे आणून द्यावेत, घरातील बाजार तिने स्वतः भरावा या कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून त्रास दिला आहे. या त्रासाला कंटाळून मृत सुजाता हिने दि.६ रोजी घरातून कोणास न सांगता निघून जावून भादोले गावच्या हद्दीत अरविंद दुर्गुळे यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली. सुजाता हिचा पती दिपक पांडुरंग कापरे व सासरा पांडुरंग गुंडा कापरे (दोघे रा.कोडोली) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सी.एस. भोसले करत आहेत.
Previous Articleकोडोलीत अल्पवयीन मुलीला पळवले : एकावर गुन्हा दाखल
Next Article पोलीस, होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी चौघे ताब्यात









