इतरही पिकांचे किमान भाव वाढविले, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या खरीप हंगामाकरिता केंद्र सरकारने भाताच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) 72 रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा दर 1 हजार 940 रुपये प्रतिविंमवटल झाला आहे. आता भाताच्या पेरणीला प्रारंभ झाला असून शेतकरी त्या कामात गुंतले असतानाच त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाताप्रमाणेच केंद्र सरकारने तीळ, तुरी, बाजरी इत्यादी धान्ये व तेलबियांच्या किमान आधारभूत दरातही वाढ केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती पत्रकारांना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. किमान आधारभूत किंमत व्यवस्था काढून टाकली जाणार, या विरोधकांच्या अपप्रचाराला केंद्र सरकारने कृतीने उत्तर दिले आहे. ही व्यवस्था आहे आणि पुढेही राहील. प्रत्येक वर्षी केंद्र सरकार किमान आधारभूत दरांमध्ये वाढच करीत आहे. यापुढेही परिस्थिती पाहून अशी वाढ करण्यात येईल, असे आश्वासन तोमर यांनी दिले.
इतर पिकांनाही दरवाढ
तिळाच्या दरात सर्वाधिक म्हणजे 452 रुपये प्रतिक्विंटलची वाढ करण्यात आली. तुरीच्या आणि उडदाच्या दरात प्रत्येकी 300 रुपये तर बाजरीच्या दरात 100 रुपये वाढ झाली. शेतकऱयांना समाधान वाटेल अशी ही दरवाढ आहे, असे प्रतिपादन तोमर यांनी केले.
गव्हाची सर्वाधिक खरेदी
किमान आधारभूत किमतीवर केंद्र सरकारने यंदा 4 कोटी 16 लाख टन गव्हाची खरेदी केलेली आहे. ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी तिचे प्रमाण 3 कोटी 71 लाख 33 हजार मेट्रिक टन इतके होते. यंदा त्यात 12.14 टक्के वाढ करण्यात आली आहे. गहू खरेदी करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे. पंजाबमधून सर्वाधिक 1 .32 कोटी टन, तर हरियाणातून 84.93 लाख टन गव्हाची खरेदी झाली. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून यंदा अनुक्रमे 1.288 कोटी टन आणि 45.78 लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे.
बॉक्स
रेल्वेलाही स्पेक्ट्रम मिळणार
भारतीय रेल्वेसाठी 5 मॅगाहर्टझ् इतक्या प्रमाणात 4-जी स्पेक्ट्रम देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रेल्वेची दूरसंचार व सिग्नल प्रणाली सुधारित बनविण्यासाठी हा स्पेक्ट्रम देण्यात आला. या योजनेवर पुढील पाच वर्षांमध्ये 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. रामगुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला. 2012 च्या हिशेबांनुसार ही गुंतवणूक वाढविली जाणार आहे.
बॉक्स
विविध पिकांना दरवाढ…
पीक 2020 2021 दरवाढ
भात (सामान्य) 1,868 1,940 72
भात (अ ग्रेड) 1,888 1,960 72
ज्वारी (हायब्रीड) 2,620 2,738 50
ज्वारी (मालदांडी) 2,640 2,758 118
बाजरी 2,150 2,250 100
नाचणी 3,295 3,377 82
मका 1,850 1,870 20
तूर 6,000 6,300 300
उडीद 6,000 6,300 300
मूग 7,196 7,275 79
भुईमूग 5,275 5,550 275
सूर्यफूल बीज 5,885 6,015 130
सोयाबीन (पिवळे) 3,880 3,950 70
तीळ 6,855 7,307 452
नायजेरसीड 6,695 6,930 235
कापूस 5,515 5,726 211
कापूस (लांबधागा) 5,825 6,025 200