प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात लॉकडाऊन करण्यात आल्याने शहरवासीयांना भाजी पुरवठा करण्याची जबाबदारी फलोत्पादन खात्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भाजी आणण्यासाठी फलोत्पादक खात्याचे प्रतिनिधी कुदेमनी येथे गेले असता महाराष्ट्र हद्दीत जाताच पोलीसांनी बंदीस्त करून त्यांना चंदगड येथे होम क्वारंटाईन केले. त्यामुळे भाजी पुरवठय़ाच्या कामात दोन दिवस व्यत्यय निर्माण झाला.
कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. शहरवासीयांना बाजीपुरवठा करण्याची जबाबदारी फलोत्पादन खात्याकडे सोपविण्यात आली आहे. याकरिता वाहनांची नियुक्ती करण्याबरोबरच भाजी पुरवठा करण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सदर प्रतिनिधी शेतकऱयांकडून भाजी खरेदी करून लहान चारचाकी वाहनामधून विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. ही प्रक्रिया महिन्याभरापासून सुरू आहे. पण बेळगाव शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने कर्नाटक महाराष्ट्र सीमा सीलडाऊन करण्यात आल्या आहेत. गॅस, भाजी पुरवठा करणारे तसेच शेतकऱयांच्या भाजीच्या गाडय़ा सोडण्यास देखील महाराष्ट्र पोलीसांकडून टाळाटाळ सुरू आहे. कर्नाटकातील एकाही व्यक्तीला महाराष्ट्राच्या सीमा हद्दीत घेणार नाही. असे सांगण्यात येत आहे. एखाद्यावेळेस कर्नाटकातील व्यक्ती सापडल्यास त्यांना थेट होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.
कुदेमनी येथे मोठय़ा प्रमाणात भाजी पाला उत्पादित केला जातो. त्यामुळे फलोत्पादन खात्याचे प्रतिनिधी निलेश मुतकेकर हे कुदेमनी येथील शेतकऱयांकडून विविध भाजीपाला खरेदी करण्यासाठी बेळगुंदी मार्गे गेले असता महाराष्ट्र हद्दीत जाताच पोलीसांनी त्यांचा ट्रक अडविला. भाजी खरेदी करण्यासाठी कुदेमनी येथे जात असल्याचे सांगूनही ट्रक सोडला नाही. तर बेळगाव येथील फलोत्पादन खात्याच्या सहसंचालकांनी चंदगड पोलीसांना संपर्क साधून फलोत्पादन खात्याचे प्रतिनिधी असल्याची माहिती देवून ट्रक सोडण्याची विनंती केली. पण चंदगड पोलीसांनी कोणाचेही ऐकले नाही. ट्रक ताब्यात घेऊन चंदगड पोलीस स्थानकात पाठविला तर निलेश मुतकेकर यांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन केली. भाजी खरेदी करण्यासाठी गेले असता थेट क्वारंटाईन करण्यात आले. दोन दिवस प्रयत्न करूनही त्यांना सोडण्यात आले नाही. त्याच ठिकाणी मुंबई व पुणे अशा विविध भागातून नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी विनंती करून अखेर दोन दिवसानंतर मुतकेकर यांनी आपली सुटका करून घेतली.









