बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडील थकलेले भाडे वसूल करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेंतर्गत महापालिका आयुक्तांनी महात्मा फुले भाजीमार्केटला सोमवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. सदर भाजीमार्केटमध्ये बेकायदेशीररीत्या ठाण मांडलेल्या व्यावसायिकांना हटविण्याची सूचना केली. गाळे बंद करण्याचा आदेशही बजावला.
व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी मागील तीन ते चार वर्षांपासून भाडे भरले नाही. त्यामुळे थकीत भाडे वसूल करण्यासाठी टाळे ठोकण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार मटण मार्केट, महात्मा फुले भाजी मार्केट, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील गाळे, गोवावेस आणि टिळकवाडीतील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई राबविण्यात आली होती. मात्र महात्मा फुले भाजी मार्केटमधील खुल्या कट्टय़ावर बसलेल्या गाळेधारकांवर कारवाई कशी करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्याची पाहणी सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्यासह महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, अनिल बिर्जे, शिवा चौगुले, साहाय्यक अभियंत्या मंजुश्री एम. आदींनी केली. यावेळी सदर गाळे खुले असल्याने कारवाई करणे अडचणीचे असल्याचे निदर्शनास आले. पण याचा गैरफायदा घेऊन गाळेधारकांनी कित्येक वर्षांपासून भाडे थकविले आहे. सूचना करूनही भाडे भरत नसल्याची माहिती महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर यांनी महापालिका आयुक्तांना दिली.
महात्मा फुले भाजीमार्केटला पूर्णपणे टाळे ठोकण्याची सूचना आयुक्तांनी केली. अनधिकृतरीत्या ठाण मांडलेल्या व्यापाऱयांची यादी तयार करण्याची सूचना करून कारवाई करण्याचा आदेश बजावला. सदर गाळे ताब्यात घेऊन लिलाव पद्धतीने भाडेतत्त्वावर देण्याची सूचना आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली. त्यामुळे सदर भाजीमार्केटला लवकरच बंदिस्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे..









