प्रतिनिधी/ बेळगाव
मागील महिन्यापासून भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. शनिवारच्या आठवडी बाजारात मागील आठवडय़ाच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. भाजीपाल्याची आवक समाधानकारक असून एक भाजी स्वस्त तर दुसरी भाजी महाग असे चित्र दिसून येत आहे.
गत आठवडय़ाच्या तुलनेत शनिवारी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. यामुळे टोमॅटोचा दर दहा किलोला 300 रुपये झाला आहे. यामुळे किरकोळ बाजारात पन्नाशी गाठलेला टोमॅटोचा दर देखील उतरला आहे. भेंडी 500 ते 550 रु. दहा किलो, गवारी 400 ते 450 रु., ढबू मिरची 500 रु., कोबी 250 ते 270 रु. बिन्स 600 रु., फ्लॉवर 500 रु. दीड डझन, कारली 450 ते 500 रु. दहा किलो, दोडकी 600 ते 650 रु. दहा किलोप्रमाणे भाज्यांचे दर आहेत. पालेभाज्यांचे भाव तर अधिकच वाढले आहेत. मेथी 800 ते 1000 रु. शेकडा, पालक 600 ते 700 रु. शेपू 700 ते 800 रु., लालभाजी 800 ते 1000 रु., कांदा पात 600 रुपये शेकडा असा दर आहे.
मागील आठवडय़ात 1500 रु. शेकडा असणारा कोथिंबिरीचा दर घसरला असून 400 ते 600 रु. शेकडा असा आहे. कोरोनाच्या संकटाबरोबरच पावसामुळे नुकसान झाले. यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढच होत गेली. मात्र या आठवडय़ात भाजीपाल्याची आवक समाधानकारक असून टोमॅटोचा आणि कोथ्ंिांबिरीचा दर घसरला आहे.









