प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनचा परिणाम यामुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या सर्वसामान्यांना दैनंदिन गरजा भागविताना महागाईचा सामना करावा लागत आहे. अन्न ही मूलभूत गरज पूर्ण करताना वाढता वाढता वाढणाऱया भाजीपाल्याच्या दराने रोजच्या आहाराला संकटाची झळ पोहचली आहे. पावसाचा मारा, कोरोनाच्या संकटात व्यवसाय करताना येणाऱया मर्यादा आणि मंदावलेली भाज्यांची आवक यामुळे भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वाढले आहेत. परिणामी या आठवडय़ात भाजीपाल्याच्या दराने जेवणातील भाज्यांची जागा कडधान्यांनी घेतली आहे.
रोजच्या भाजी-आमटीत वापरला जाणारा टोमॅटो 40 ते 50 रुपये किलोवर जाऊन पोहचला असून बाजारातून पालेभाज्या गायब झाल्या आहेत. कोथिंबिर 10 ते 20 रु. जुडी, मेथी 15 ते 20 रु. जुडी, लालभाजी 10 रु. जुडी, कांदाभाजी 10 रु. दोन जुडी असे दर आहेत. पालेभाज्याची आवक मंदावल्याने मागील आठवडय़ात सहज उपलब्ध होणाऱया पालेभाज्या आता क्वचितच पाहायला मिळत आहेत. मिरची 40 ते 50 रु. किलो, कोबी 10 रु. नग, वांगी 30 ते 40 रु. किलो, बीट 40 रु. किलो, ढबू मिरची 40 ते 50 रु. किलो, दोडकी 50 ते 60 रु. किलो, कारली 50 ते 60 रु. किलो, भेंडी 40 ते 50 रु. किलो, चवळी 40 ते 50 रु. किलो आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ गृहिणींच्या रोजच्या भाजीच्या खर्चाचे आर्थिक गणित बदलणारी ठरली आहे.
कांद्याने आणले डोळय़ात पाणी
सध्या कांद्याचे दर वाढले असून चांगला कांदा 50 ते 60 रु. किलोवर जाऊन पोहचला आहे. लहान कांदा 20 ते 30 रु. किलो आहे. मात्र आकारमानानुसार व जुना टिकणारा कांदा मात्र पन्नाशी ओलांडून गेला आहे. यामुळे कांद्याने महिलावर्गाच्या डोळय़ात पाणी आणले आहे. यामुळे साठवणुकीतील जुन्या कांद्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नवीन कांदा नुकताच बाजारात येत असला तरी जुना कांद्याला मागणी असून त्या तुलनेत आवक नसल्याने दर वाढतच असल्याचे मत व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.









