सलग दुसऱया वर्षीही कोरोना महामारीचा शेतकऱयांना फटका
वार्ताहर/ उचगाव
कोरोना महामारी काळातील लॉकडाऊनचा शेतकरी वर्गाला सलग दुसऱया वर्षी ही रब्बी हंगामातील भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. गाजर, मुळा, कोथिंबीर, मिरची, कोबी, गवार, भेंडी, काकडी, मका अशा विविध पिकांतून मिळणाऱया लाखो रुपयांवर अक्षरशः पाणी सोडण्याची वेळ आज शेतकरी वर्गावर आल्याने शेतकरी हतबल झाला असून, कर्जबाजारी शेतकरी वर्गासमोर आता जगावे कसे असा प्रश्न आ वासून उभा आहे.
बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर शेत जमिनीत भात कापणीनंतर बटाटा पिकाचे उत्पादन घेतले जाते. बटाटा पिकानंतर लागलीच या जमिनीमध्ये भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. उचगाव, बेळगुंदी, राकसकोप, कुद्रेमनी, तुरमुरी, बाची, कोनेवाडी, कल्लेहोळ, बेनकनहळ्ळी, बसुर्ते, बेकिनकेरे, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी या संपूर्ण भागामध्ये भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. अलीकडच्या काळामध्ये गाजर, काकडी अशी पिके देखील मोठय़ा प्रमाणात काढली जातात. याबरोबरच मुळा, कोथिंबीर, मिरची, कोबी, नवलकोल, फ्लॉवर, मका अशी पिकेही घेतली जातात. अशा भाजीपाल्याच्या पिकातून शेतकऱयांच्या हाती चांगला दर मिळाला. त्याची विक्री झाली तर चार पैसे हाती येतात.
व्यापाऱयाअभावी शेतीमाल मार्केटमध्ये पडून
सध्या लॉकडाऊन झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाहेरच्या व्यापाऱयाअभावी शेतीमाल तसाच पडून आहे. यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे वेळीच शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सोमवारपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्याने शेतामध्ये तयार झालेला भाजीपाला, भाजी मार्केटपर्यंत पोहचविणे मुश्कील झाले आहे. नागरिकांना अत्यावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी सकाळी 6 ते 10 या वेळेत मुभा देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. 10 वाजण्यापूर्वी पोलीस खात्याकडून भाजीपाला नेणाऱया टेम्पोंना अडवून त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दुचाकीवरूनदेखील घराबाहेर पडण्यास शासनाने मज्जाव केल्याने भाजीपाला बाजारपेठेपर्यंत कसा पोहचवावा. तसेच सदर भाजीपाला शहरातून फिरत्या वाहनातून विक्रीही करण्यास विरोध होत असल्याने अखेर शेतकरी वर्गाला भाजीपाला शेतातच ठेवण्याची वेळ आली आहे.
भाजीपाला कुजून आणि उन्हाच्या तडाख्याने खराब
शेतवाडीमध्ये सर्व भाजीपाला कुजून आणि उन्हाच्या कडाक्याने खराब होत असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे. शेतातील भाजीपाला काढून तो विक्री कोठे करावा हा प्रश्न शेतकरी वर्गावर असल्याने सध्या सर्व भाजीपाला शेतातच पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे.









