सर्वसामान्यांसह गृहिणींचे बजेट कोलमडले
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाल्याच्या दरात मागील आठ दहा दिवसांपासून भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मागील 15 दिवसात कारली, बिन्स, टोमॅटो, ढबू, भेंडी, वांगी आणि कोथींबीरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीबरोबर भाजीपाल्याच्या दराचे चटके बसत आहेत.
शनिवारच्या किरकोळ भाजीपाला बाजारात कारली 50 रूपये किलो, बिन्स 80 रूपये किलो, टोमॅटो 40 रूपये किलो, ढबू 40 ते 60 रूपये किलो, काकडी 60 रूपये, मेथी 30 रूपयाला दोन पेंडय़ा, कांदापात 20 रूपयाला 4 पेंडय़ा, लालभाजी 20 रूपयाला 4 पेंडय़ा, दुधी भोपळा 20 रूपयाला 1, कांदा 25 ते 30 रूपये किलो, बटाटा 25 ते 30 रूपये तर रताळी 25 ते 30 रूपये दराने विक्री सुरू होती.
कोथींबीर खातेय भाव
मागील आठवडाभरात कोथींबीरच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. एरवी 5 ते 10 रूपयाला मिळणाऱया कोथींबीर पेंडीचा दर 25 ते 30 रूपये झाला आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांना कोथींबीरचा भाव पाहून तोंडात बोटे घालण्याची वेळ आली आहे. तर भाजीपाल्याचे दर ऐकून नागरिक भाजीपाला ऐवजी कडधान्य खरेदीला पसंती देत आहेत.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे गृहीणींना अधिक पैसे मोजून खरेदी करावी लागत आहे.
भाजीपाला दरात वाढ झाल्याने नागरिक बटाटा व इतर फळभाज्या खरेदी करताना दिसत आहेत. मागील 15 दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर वाढतच चालल्याने महागाईच्या कचाटय़ात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.









