चिपळूण-कराड रस्त्यावर सती येथील घटना,
चिपळूण / वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदी व जिल्हाबंदी असतानाही चिपळूण तालुक्यातून छुप्यापध्दतीने प्रवासी वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला. भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली खेर्डीतील 23 कर्नाटकी कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप गाडी पलटी झाल्याने हा प्रकार समोर आला. मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास कराड महामार्गावरील सती घडलेल्या या अपघातात चालकासह 8 जण किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती वाहनचालक निलेश मारूती चव्हाण (26, रा. शिरगांव) याने चिपळूण पोलिसांना दिली. या अपघातात चालक चव्हाण याच्यासह सौरभ रघुनाथ चव्हाण (18), लक्ष्मीबाई चव्हाण (40), कस्तुरीबाई कस्तुरअप्पा जाधव (26), काळू यकाप्पा चव्हाण (45), तिरीबाई भंगाराप्पा चव्हाण (50), राजू तुकाराम राठोड (29), कस्तुरअप्पा जाधव (28) आदी जखमी झाले आहेत. बोलेरो पिकअप गाडी घेऊन चव्हाण मंगळवारी मध्यरात्री भाजीपाला आणण्यासाठी चिपळूणहून कराडला जात होता. याचदरम्यान त्याने खेर्डी पुलाजवळ 23 प्रवाशांना गाडीमध्ये घेतले. यामध्ये लहान मुलांपासून तरूण, महिला व पुरूष यांचा समावेश होता. या सर्वांना विजापूरला जायचे होते.
खेर्डीपासून काही अंतरावर सती तिठा येथे त्याचा ताबा सुटल्याने बोलेरो पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच या मार्गावर गस्त घालणाऱया तसेच सती तेथील पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना 108च्या रूग्णवाहिकेने पहाटे 3.15 वाजता कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
गावाकडे जाण्यासाठी कर्नाटकी कुटुंबांचा तगादा
कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी व लॉकडाउन असल्याने गेल्या अनेक वर्षापासून खेर्डात राहतात. काम बंद असल्याने उपासमारी होत असल्याचा, तसेच कोरोनाच्या भीतीमुळे गावाकडे परतण्याचा तगादा कुटुंबीयांनी लावला होता. महसूलने या कुटुंबांची जबाबदारी स्वीकारत येथेच राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र तरीही काही दिवसांपूर्वी चालत व आता गाडीतून चोरटय़ा मार्गाने या कुटुंबांनी गावाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू
जिल्हाबंदी, संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूं, भाजीपाला, औषधे, फळांची विक्री व वाहतूक सुरू आहे. याचाच गैरफायदा घेत भाजीपाला वाहतूकीच्या नावाखाली बोलेरो चालक चव्हाण याने नियम धाब्यावर बसवून छुप्यापध्दतीने प्रवासी वाहतूक करण्याचा डाव आखला होता. खेर्डी पोलीस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, अपघातातील बोलेरो गाडी जप्त करण्यात आली आहे.
प्रांत, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांची कामथेत धाव
सती येथील अपघाताची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सुर्यवंशी तसेच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी कामथे उपजिल्हा रूग्णालयात धाव घेत जखमी प्रवाशांची माहिती घेतली.









