काँग्रेसच्या नेत्या वीणा काशप्पण्णावर यांची टीका
प्रतिनिधी / बेळगाव
भाजपने देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, कामगार यांचे शोषण केले आहे. भाजप हे अपयशी ठरले आहे. कारण दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेवर आत्महत्या करण्याची वेळ या भाजपने आणली आहे. भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरले असून बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जनता निश्चितच धडा शिकविणार आहे. सतीश जारकीहोळी हे काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार असून त्यांच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन राज्य महिला काँग्रेसच्या नेत्या वीणा काशप्पण्णावर यांनी केले आहे.
काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा प्रचार करून त्या पत्रकारांशी बोलत होत्या. काँग्रेसने बुधवारी विविध ठिकाणी प्रचार केला. सर्वत्र प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेसचा विजय हा निश्चित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सिद्धरामय्या यांच्या काळात 168 पैकी 165 आश्वासने काँग्रेसने पूर्ण केली आहेत. मात्र, भाजपने देशातील आणि राज्यातील जनतेला जी आश्वासने दिली आहेत त्यामधील एकही पूर्ण केले नाही. यावरून या सरकारने सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे, असे त्यांनी सांगितले.
भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः वैतागली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जीवन जगणे अवघड झाले आहे. बेळगाव येथूनच भाजपच्या पराभवाची मालिका सुरू होणार असल्याचे त्या म्हणाल्या.









