राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /पणजी
कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय भाजप राज्य कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. तरीही निवडणूक असल्यामुळे त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णयात बदल होऊन युती होऊही शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. युतीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करताना मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. भाजप राज्य कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी महामंत्री ऍड. नरेंद्र सावईकर व दामू नाईक यांची उपस्थिती होती. कोविड मार्गदर्शक तत्वांमुळे बैठकीस मर्यादित सदस्यांची उपस्थिती होती. राज्यसभा खासदारासह बहुतेक मंत्री तसेच आमदार उपस्थित होते. मात्र मंत्री विश्वजित राणे आणि आमदार बाबूश मोन्सेरात हे राज्याबाहेर असल्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, असे तानावडे यांनी सांगितले.









