प्रतिनिधी / कोल्हापूर
.
जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात सापडली असताना आता हायब्रीड ऍन्युटी योजनेंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात हे रस्ते झाले आहेत. योजनेअंतर्गत घेतलेली कामे आजघडीला बंद आहेत. रस्त्यांचे ठेकेदार गायब झालेत. असा आरोप करीत चंद्रकांतदादांनी किमान आपल्या जिल्ह्यातील रस्ते तरी चांगले करायचे होते असा टोलाही मुश्रीफ यांनी लागावला आहे. शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे ते प्रसार माध्यंमाशी बोलत होते.
500 ते 900 टक्क्यांनी प्रकल्पांची किंमत वाढवली
भाजप सरकारने एकेका प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता ही मूळ किंमतीच्या 500 ते 900 टक्के एवढी वाढवून दाखवली आहे. या प्रकल्पांमधील गैरव्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे. जिल्ह्यातील गारगोटी – कोल्हापूर हा रस्ता दोन वर्षातच खराब झाला. निपाणी – राधानगरी रस्त्याचे कामच बंद आहे. चौकशीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण लवकरच पत्र देणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.