एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उद्या निवडणूक
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रदेश अध्यक्षपदासाठी आज शनिवार दि. 11 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत अर्ज दाखल करण्यात येणार असून एका उमेदवारापेक्षा जास्त अर्ज आले तरच उद्या रविवारी दि. 12 रोजी सकाळच्या सत्रात मतदान घेवून नंतर होणाऱया कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्षाची निवड जाहीर करण्यात येणार आहे. हा मेळावा सकाळी 11 वा. पणजीत गोमंतक मराठ समाजाच्या हॉलमध्ये होणार आहे.
भाजपचे निर्वाचन अधिकारी गोविंद पर्वतकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की, या निवडणुकीसाठी भाजपचे निरीक्षक म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश खन्ना उपस्थित राहाणार आहेत. भाजपच्या गोव्यातील संघटनात्मक निवडणुका गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे जुलै 2019 पासून चालू आहेत. प्रथम प्राथमिक सदस्यत्व नोंदणी करण्यात आली त्यानंतर 1952 बूथ समितीच्या व 38 मंडळ समितीच्या निवडणुका झाल्या. प्रत्येक बूथ समितीवर एक अध्यक्ष – 10 सदस्य नेमण्यात आले असून 40 पैकी 38 मतदारसंघातून मंडळ समिती नेमल्या आहेत. काणकोण व थिवी मतदारसंघातील समित्या नेण्याचे काम बाकी आहे, असे त्यांनी नमूद केले.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्हा समित्याची निवडही पूर्ण झाली असून उत्तर गोवा अध्यक्षपदी सुखाजी नाईक तर दक्षिण गोवा अध्यक्षपदी सर्वानंद भगत यांची निवड करण्यात आल्याची माहिती पर्वतकर यांनी दिली.
अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची खात्री पर्वतकर यांनी प्रकट केली. अध्यक्षपद निवडणुकीसाठी एकूण 52 मतदार असून गरज पडली तरच ते मतदान करतील. आतापर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक एकमताने झाली असून याहीवेळी तोच पायंडा कायम राहील असे ते म्हणाले. साहाय्यक निर्वाचन अधिकार उल्हास अस्नोडकर त्यावेळी उपस्थित होते.









