हरमल / वार्ताहर
जिल्हा पंचायत निवडणुकीत हरमल व मोरजी मतदारसंघात भाजप उमेदवार पराभूत झाल्याचे खापर आपल्या माथ्यावर फोडण्याचे कारण हास्यास्पद असून मंडळ अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या तोंडातून वदवून घेणाऱयाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मतदानाच्या दिवशी दोन्ही जागा भाजपच जिंकणार ही आत्मप्रौढी कुठे गेली? पदाधिकाऱयांनी बोलवित्या धन्यापासून सावध रहावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
पालये जत्रोत्सवास गेलो असता एका समर्थकाने सांगितले की, मांदे भाजप मंडळाने आपला पराभव मान्य केला आहे, त्यापेक्षाही मतदारसंघात पार्सेकरांचीच लोकप्रियता अद्यापि टिकून असल्याची कबुली त्यांनीच दिल्याने तुम्ही स्पष्टीकरण देऊ नका असा सल्ला आपणास दिला होता, असेही ते म्हणाले.
धनंजय खरे बोलले, गडेकर खोटे का बोलले?
मांदे भाजप मंडळ व अन्य समितीने केलेल्या आरोपांचे खंडन पार्सेकर यांनी केले. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी अनंत गडेकर व धनंजय शेटगांवकर व अन्य उमेदवारसुद्धा आपणास भेटण्यास आले होते. दोन्ही उमेदवार व अन्य उमेदवारांनासुद्धा आपण आशीर्वाद दिले होते, परंतु धनंजय खरे बोलले, मात्र गडेकर का खोटे बोलले? ह्याविषयी मात्र समजू शकत नाही. आपण भाजपच्या उमेदवारांचा पाडाव करणार असे वक्तव्य निखालस खोटे असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
मंडळ पदाधिकाऱयांना ’त्या’ भोगण्याची व्याख्या माहीत असावी
आपण भाजपचा कार्यकर्ता, 1989 पासूनच्या निवडणुकीत 350 मते घेत निवडणूक लढवली होती व दोन टर्म पक्षाचे अध्यक्षपद भूषविले, त्यानंतर तीन निवडणुकीत आमदार बनलो. पाच वर्षे मंत्री व मुख्यमंत्रीपद भूषविले. आपण कधीही पदे भोगली नाहीत, कदाचित मंडळ पदाधिकाऱयांना ’त्या’ भोगण्याची व्याख्या माहीत असावी. जि.पं. निवडणुकीतील मते पाहता, घसरण झालेल्या 7 हजार मतांचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
वदवून घेणाऱयापासून सावधगिरी बाळगावी
मांदेच्या आमदारांनी निवडलेल्या पदाधिकारी व अन्य लोकांनी आपणास पक्ष नि÷sविषयी सांगण्याची गरज नाही. त्यांच्यावर आपला रोष नाही, कारण त्यांचा बोलविता धनी पत्रकारांच्या बैठकीमागे उभा होता. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असला तरी मांदे व गोव्यातील जनता आपणास पूर्ण ओळखून आहे. दीड दोन वर्षांपूर्वी भाजपात आलेल्या मंडळींनी वदवून घेणाऱया व्यक्तीपासून सावधगिरी बाळगावी, अशी सूचनाही पार्सेकर यांनी केली आहे.
गडेकर यांनी स्वतःचे हसे करुन घेतले
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीपूर्वी आपण दोन्ही उमेदवारांचा पाडाव करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघाचे पराभूत उमेदवार गडेकर यांनी करून स्वतःचे हसे करून घेतले आहे.
शैक्षणिक संस्थेच्या कार्याचे मोजमाप करणे कठीण
आपली शैक्षणिक संस्था 1967 साली स्थापन झाली व आमदारपदी नसताना उच्च माध्यमिक व कॉलेज झाले. संस्थेने जे अमूल्य कार्य केले त्याचे मोजमाप होणे कठीण आहे. ह्या संस्थेसाठी त्यांचे योगदान त्यांनी सांगावे असे स्पष्ट केले. जमल्यास भाईंना सोबत घेऊन एखादी शैक्षणिक संस्था स्थापन करावी. संस्थेमुळे पार्सेकर याना फायदा असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. उलट नोकऱया देण्यासाठी काँग्रेसमधून भाजपात गेले, गणपतीचा फोटो हातात घेऊन नोकऱया देणार, मंत्रिपद मिळणार असे खूप काही सांगितले त्या नोकऱयांची यादी जाहीर करावी, असा उपरोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिला.
जिल्हा पंचायतीवर निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांचे अवमूल्यन करू नये, उलट तुमच्या दोषांवर उपाय करा. आपला त्या उमेदवाराबरोबर फोटो प्रसिद्ध होणे हे गैर नव्हे. आपण माजी लोकप्रतिनिधी असल्याने कोणीही आपली भेट व फोटो घेतच असतात, त्यामुळे आक्षेप व्यवहार्य नाही. खुद्द अनंत गडेकर आपल्या शैक्षणिक संस्थेचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे एखादा फोटो असेलच. मांदे भाजपने आम्हा नेत्यांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घेतले, उलट माजी जिं पं सदस्य अरुण बांधकर याना डावलण्याचे कारण काय. त्यामुळे आम्ही सद्सदविवेकबुद्धीने कार्य केले यात आमचा दोष तो कसला, असा सवाल माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केला.









